वडाळ्यात व्यावसायिकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:17 AM2019-04-25T01:17:29+5:302019-04-25T01:17:46+5:30
वडाळागावातील मदिनानगर येथे असलेल्या मदार स्क्रॅप सेंटरचे संचालक रियाज अब्दुल हमीद शेख ऊर्फ लालशेठ (६०) यांच्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात संशयित हल्लेखोरांच्या टोळक्याने दुकानात घुसून धारदार शस्त्र व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला.
नाशिक : वडाळागावातील मदिनानगर येथे असलेल्या मदार स्क्रॅप सेंटरचे संचालक रियाज अब्दुल हमीद शेख ऊर्फ लालशेठ (६०) यांच्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात संशयित हल्लेखोरांच्या टोळक्याने दुकानात घुसून धारदार शस्त्र व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या त्यांच्या दोघा मुलांनाही टोळक्याने जखमी केले. जखमी बाप-लेकांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मदिनानगर येथील भंगार माल खरेदी-विक्रीच्या दुकानावर नियमितपणे रियाज शेख व त्यांची मुले अश्पाक आणि अल्ताफ बसलेली होती. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तेथे सहा ते सात युवकांचे टोळके दुचाकींवरू न आले. त्यांनी त्यांच्या मुलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. फायनान्स कंपनीचे कर्ज काढून घेतलेल्या वाहनाचे हप्ते भरण्याच्या वादातून टोळक्याने कुरापत काढत लाठ्या-काठ्या व धारदार शस्त्र आणून बाप-लेकांवर हल्ला चढविल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात लालशेठ यांच्यासह त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत. दरम्यान, संशयित हल्लेखोरांकडून त्यांच्या दुकानात धुडगूस घालत दुकानातील साठ ते सत्तर हजारांची रोकड लांबविल्याचे लालशेठ यांनी सांगितले. इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविले. यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांच्या दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. या घटनेने परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी तातडीने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयात तणाव
जखमींना रुग्णालयात दाखल करताच काही वेळेत त्यांचे नातेवाईक व युवकांनी मोठी गर्दी केल्याने मोठा जमाव जमला होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी तत्काळ सरकारवाडा पोलिसांच्या पथकासह राखीव पोलिसांची एक तुकडी दाखल झाली. पोलिसांनी गर्दीला पांगविले व नातेवाइकांना रुग्णालयातून बाहेर काढले.
तिघे पोलिसांच्या ताब्यात
४ रु ग्णालयात इंदिरानगर पोलिसांनी धुडगूस करतानाच्या चित्रीकरणावर संशयित अमजद कादर शेख, ओवेस शकील शेख, अरबाज शेख या तिघांची ओळख पटविली. हे तिघे रुग्णालयात जखमी होऊन उपचारासाठी आले होते. याचवेळी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करत ताब्यात घेतले. त्यांचे अन्य चार ते पाच साथीदार फरार आहेत. संशयित हे जुने नाशिक व भारतनगरमधील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.