नाशिक महापालिकेवर आज हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:45 AM2018-04-23T00:45:09+5:302018-04-23T00:45:09+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींसाठी करयोग्य मूल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरुद्ध शहरात विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार, दि. २३ रोजी होणाऱ्या महासभा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींसाठी करयोग्य मूल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरुद्ध शहरात विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार, दि. २३ रोजी होणाऱ्या महासभा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरत असतानाच त्यांनी मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींसाठी करयोग्य मूल्यवाढ सुचविल्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक एकवटल्याने सोमवारी होणारी महासभा वादळी होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची आचारसंहिता जाहीर झाली असतानाच महासभा होत असल्याने या सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही. मात्र सदस्य आपल्या भावना व्यक्त करून जनतेचे प्रतिनिधित्व सभागृहात करणार आहेत. करयोग्य मूल्यवाढीमुळे निर्माण होणाºया कराचा मुद्दा गंभीर बनला आहे. या करवाढीच्या विरोधात शेतकरी वर्गासह कारखानदार, व्यावसायिक संघटित होत असून, ठिकठिकाणी आयुक्तांविरोधात मेळावे घेण्यात आले आहे. दि. २३ रोजी रोजी दुपारी १ वाजता होणाºया महासभेत करयोग्य मूल्यवाढीचा मुद्दा अग्रक्रमावर असल्याने त्या विरोधासाठी भाजपासह अन्य राजकीय पक्षांनीदेखील कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर अन्याय निवारण कृती समितीने शहरातील प्रभागनिहाय भागांचा दौरा करून या प्रकरणी जनजागृती मोहीम पूर्ण केली आहे. मूल्यवाढीच्या प्रकरणावरून सभागृहात नगरसेवक आयुक्तांना धारेवर धरणार आहेत, तर इकडे सभागृहाबाहेर पालिकेसमोर शेतकरी, उद्योजक, व्यापारी तीव्र घोषणाबाजी करणार आहेत.
यांचा असेल सहभाग
या आंदोलनास राजकीय पक्ष, संघटना, निमा, आयमा, आयएमए नाशिक वकील संघ, महाराष्टÑ चेंबर्स आॅफ कॉमर्स, श्रमिक सेना, मोटार डीलर्स असोसिएशन, हॉटेल असोसिएशन आदींनी पाठिंबा दिला आहे. करवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२३) राजीव गांधी भवन येथे ‘मी नाशिककर’ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभाग व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
मी नाशिककर
शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने ‘मी नाशिककर’ हे जनआंदोलन सोमवारी (दि.२३) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राजीव गांधी भवनसमोर करण्यात येणार आहे. मनपाने सर्व प्रकारच्या शेतजमिनी, ओपन स्पेस, खेळण्याची मैदाने, वॉचमन कॅबिन, हॉस्पिटल व प्रसूतिगृह, हॉटेल, शाळा व विद्यार्थी वसतिगृह, बंगला व सोसायटीची साईड मार्जिन जागा, लॉन्स, फुलझाडांच्या नर्सरी, पोहण्याचे तलाव, जिम, सर्व्हिस स्टेशन इत्यादी सर्व प्रकारच्या मिळकतींवर नव्यानेच मोठी करवाढ केली आहे. भाडेकरू असलेल्या मिळकतींवर तीनपट अधिक करवाढ करून नाशिककरांची आर्थिक कोंडी केली जात आहे. करवाढ मागे घेण्यात यावी, याकरिता कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे.