किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट : प्रवीण दरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 01:32 AM2022-02-07T01:32:14+5:302022-02-07T01:32:48+5:30
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांंच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असून, यात शिवसैनिकांना आदेश देणारे व सत्तेत सहभागी असणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करतानाच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यामागील सत्य समोर येईल, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.
नाशिक : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांंच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असून, यात शिवसैनिकांना आदेश देणारे व सत्तेत सहभागी असणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करतानाच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यामागील सत्य समोर येईल, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.
मालेगाव येथे एका खासगी कामासाठी जाताना प्रवीण दरेकर शनिवारी रात्री नाशिकधील शासकीय विश्रामगृहात मुक्कामास होते. त्यांनी रविवारी (दि. ६) सकाळी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर अनेक विषयांवर हल्लाबोल केला. किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनीच हल्ला केल्याचे उघड झाले असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. शिवसैनिकांना आदेश देणारे आणि त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्यांकडूनच हा हल्ला करण्यासाठी फूस देण्यात आल्याचे आरोप करतानाच त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले. दरम्यान, खासदार उदयन राजे भोसले व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट चर्चेचा विषय ठरणारी असली तरी ही केवळ विकासकामासंदर्भात झालेली भेट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
---
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे अशाप्रकारे झेड सुरक्षा कवचामध्ये असलेल्या माजी खासदारावर खुलेआम जिवघेणा हल्ला करण्यात आला. हा प्रकार महाराष्ट्रासाठी आणि राज्य सरकारसाठी अशोभनीय असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.
---
वाहतूक व्यवस्था विस्कळीत
राज्यातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना महाविकास आघाडी सरकर व परिवहनमंत्री एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवून शकलेले नाही. त्यामळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होत असून, सरकाराने या विषयी गांभीर्याने विचार करून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.
--
मुंबईची सत्ता देणे भाजपची चूकच
मुंबईतसारखेच नगरसेवक असताना महापालिकेची सत्ता बिनविरोध शिवसेनेला देणे ही भाजपची १०० टक्के चूकच होती, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. २५ वर्षांची युती असल्याने शिवसेनेला सत्ता दिली होती. मात्र यावेळी अशी चूक होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.