राहुल गांधींच्या यात्रेवरील हल्ला भाजपाच्या गुंडांनीच केला, संजय राऊत यांची जोरदार टीका
By दिनेश पाठक | Published: January 22, 2024 02:03 PM2024-01-22T14:03:01+5:302024-01-22T14:04:16+5:30
एकनाथ शिंदे यांनी आमचा पक्ष चोरला. आमची नेमप्लेट चोरली. राष्ट्रवादीतील काही लोकांनी देखील त्यांच्या पक्षाची नेमप्लेट चोरली होती, असे सांगून राऊत यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाला जोरदार टोला हाणला.
नाशिक : आसाम येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियान यात्रेवर केलेला हल्ला हा भाजपामधील गुंडांनीच केला असून हल्ला निषेध करणारा तसेच तानाशाही निर्माण करणारा आहे, अशी घणाघाती टीका, खासदार संजय राऊत यांनी येथे सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत केली. अशा पद्धतीची तानाशाही ठेसण्याचे काम आम्ही नाशिकच्या अधिवेशनातून सुरू करणार आहोत, असे देखील राऊत म्हणाले.
अयोध्या सोहळा हा महत्त्वाचा आहेच. आम्हाला राम मंदिर होत असल्याचा अभिमान आहे, परंतु धार्मिक उत्साहाला राजकीय स्वरूप देणे भाजपाचे काम ही बाब योग्य नाही. देशातील चार शंकराचार्यांनी अयोध्येतील सोहळा घाईघाईने होत असल्याचे सांगून या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे याची आठवण देखील राऊत यांनी करून दिली. पण आम्हाला आता आजच्या श्री प्रभू रामाच्या सोहळ्यात काही राजकारण वगैरे करायचं नाही. प्रभू श्रीराम फक्त भाजपचेच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे आहेत. राम जन्मभूमीत शिवसेनेचा वाघ या थीमखाली आम्ही नाशिक येथील शिवसेना अधिवेशनाच्या ठिकाणी चित्रांचे प्रदर्शन आयोजित करीत आहोत, नाशिकनंतर हे प्रदर्शन राज्यातील विविध ठिकाणी होतील.
नागपूरला देखील या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचा अयोध्येचा आंदोलनात काय सहभाग म्हणून विचारतात तर त्यांनी नागपूर येथील प्रदर्शनाचे उद्घाटन करायला यावं. त्यांना देखील आम्ही चित्रांच्या माध्यमातून पुरावे सादर करू, असा टोला देखील राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.
राऊत यांचा फडणवीसनबाबत यू टर्न
खासदार संजय राऊत यांनी एक दिवस अगोदर पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस अयोध्येच्या कारसेवक म्हणून नव्हे तर नागपूरच्या स्टेशनवर फिरायला गेले असावे. आणि नागपूरच्या स्टेशनवरील गर्दीमधील तोच होतो फडणवीस यांनी व्हायरल केला,असा हल्लाबोल केला होता, परंतु दुसऱ्या दिवशी खासदार राऊत यांनी आपल्या या विधानावर घुमजाव केले. देवेंद्र फडणवीस अयोध्येला कारसेवक म्हणून गेले असावे आम्ही कुठे नाही म्हणतो,असे सांगून राऊत यांनी घुमजाव केले. परंतु फडणवीस यांनी अगोदर मीपणा सोडावा. अयोध्या आंदोलनात मी गेलो होतो... मी गेलो होतो असे वारंवार सांगू नये. त्यांचे हे विधान लाखो कारसेवकांचा अवमान असल्याचे राऊत यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना आम्हीच प्रथम अयोध्येला नेले होते, असे देखील राऊत सांगायला विसरले नाही.
अजित पवार यांनाही टोला
एकनाथ शिंदे यांनी आमचा पक्ष चोरला. आमची नेमप्लेट चोरली. राष्ट्रवादीतील काही लोकांनी देखील त्यांच्या पक्षाची नेमप्लेट चोरली होती, असे सांगून राऊत यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाला जोरदार टोला हाणला.