सटाणा तहसीलवर हल्लाबोल
By admin | Published: September 1, 2016 11:53 PM2016-09-01T23:53:13+5:302016-09-01T23:53:34+5:30
ग्रामस्थांचा संताप : बिलपुरी येथील विवाहिता खून प्रकरण
सटाणा : पत्नीचा लोखंडी तीक्ष्ण हत्त्याराने खून करूनही खुनी पतीच्या बचावासाठी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी व जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी संगनमत करून मोटारसायकल अपघात दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलीचे माहेर असलेल्या बिलपुरी ग्रामस्थांचा आहे. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. १) या विवाहितेचे माहेर असलेल्या बिलपुरी येथील संतप्त सातशे ते आठशे महिला-पुरु षांनी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला.
दरम्यान, येत्या ६ सप्टेंबरपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास ७ सप्टेंबर रोजी बिलपुरीचे ग्रामस्थ आपल्या मुलाबाळांसह अन्न- पाण्याचा त्याग करून गावातच उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.
पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालणारे पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक नखाते व जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक झालीच पाहिजे, अशा घोषणा देत शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून बिलपुरी, बोढरी, चिराई, टेंभे येथील ग्रामस्थांनी डॉ. शेषराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे सातशे ते आठशे महिला व पुरुष सहभागी झाले होते. ताहराबाद रोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन हल्लाबोल केला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी घटनेचा निषेध करत सहायक पोलीस निरीक्षक होळकर यांनी मृत सविताच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर पुरावा नष्ट करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येत्या ६ सप्टेंबरपर्यंत अटक न केल्यास ७ सप्टेंबरपासून बिलपुरीचे ग्रामस्थ आपल्या कुटुंबीयांसह अन्न-पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करतील, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जात घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे सांगून आपल्या भावना जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहचवून आपल्याला न्याय मिळेल यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असेल, असे सांगतले.
मोर्चात डॉ. शेषराव पाटील यांच्यासह बिलपुरीचे सरपंच सतीश पवार, जिल्हा परिषेदेचे माजी सदस्य विक्रम मोरे, अण्णा मोरे, साहेबराव पवार, विठ्ठल पवार, नूतन अहेर, सुनंदा पवार, जिजा पवार, इंदू पवार, यशोदा पवार, अंजना पवार, सीमा पवार, उषा पवार, रेश्मा पवार, सखूबाई पवार, उज्ज्वला पवार, सुषमा पवार, निर्मला पवार, शोभा अहिरे, वंदना अहिरे, वैशाली अहिरे, संगीता चव्हाण, ललिता शेवाळे यांच्यासह सातशे ते आठशेच्या संख्येने महिला-पुरु ष सहभागी झाले होते.
बागलाण तालुक्यातील बिलपुरी येथील सविता पवार हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी गोराणे येथील अरविंद श्रावण देसले याच्याशी झाला होता. सवितापासून अरविंदला एक मुलगीही आहे. मुलगा पाहिजे म्हणून त्यांचे खटकेही उडत होते. दोघांचा तंटामुक्ती समिती व नातेवाइकांनी नऊ महिन्यांपूर्वी समझोता करून सविताला सासरी नांदायला पाठवले होते. दरम्यान, गेल्या ?? जुलै रोजी सासरच्यांनी सविताला माहेरी बिलपुरीला कार्यक्रमासाठी पाठविले होते. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी रात्री ? वाजता अरविंद मोटारसायकलवर गोराण्याला जातो म्हणून घेऊन गेला. आणि पहाटे ? वाजता आसखेडा-गोराणे या रस्त्यावर अपघात झाल्याचे कळविण्यात आले होते. मात्र हा प्रकार संशयास्पद असून, सविताचा घातपात झाल्याची तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बिलपुरीच्या ग्रामस्थांनी केली होती.
मात्र जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी हा अपघातच असल्याचे सांगून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांनी मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली. मात्र त्यांनीदेखील हा अपघातच असल्याचे सांगून सहायक पोलीस निरीक्षक होळकर यांची बाजू लावून धरली. (वार्ताहर)