सराईत गुंडाकडून हमालावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:54+5:302021-02-16T04:16:54+5:30
संदेश सुधाकर पगारे (रा.पेठरोड, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी अंकुश ...
संदेश सुधाकर पगारे (रा.पेठरोड, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी अंकुश अरुण गायकवाड (रा. कालिकानगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गायकवाड दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डात हमालीचे काम करतो. शनिवारी (दि.१३) तो काम करून आपल्या घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. लक्ष्मीनगर भागात त्यास संशयित गुन्हेगाराने ‘दारू पाज नाही तर पैसे दे’ असे म्हणून त्याचा रस्ता रोखला. यावेळी गायकवाड याने दारू पाजण्यास नकार देत आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याने संतप्त पगारे याने त्याच्या कमरेला लावलेला कोयता काढून त्याच्या गालावर वार केला. या घटनेत गायकवाड जखमी झाल्याचे लक्षात येताच संशयिताने त्याच्या पॅण्टच्या खिशातील दीड हजारांची रोकड बळजबरीने काढून पोबारा केला होता. गायकवाड याने पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केल्याने अल्पावधीतच पोलिसांनी संशयित पगारे यास बेड्या ठोकल्या.
----
घरफोडी करणाऱ्या दोघांना नागरिकांनी पकडले
नाशिक : एका दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने खिडकीचे गज कापताना नागरिकांनी दोघा परप्रांतीय चोरट्यांना पकडून बेदम चोप दिल्याची घटना रेडक्रॉस भागात घडली. जागरूक नागरिकांनी पकडलेल्या चोरट्यांना पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजेंद्रसिंग नन्हेसिंग (३५) व अरुणकुमार श्रीवीरसिंग (१८ दोघे रा.रामनगर, उत्तर प्रदेश) अशी दुकान फोडण्याच्या प्रयत्नात पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी हिरावाडी रोड भागात राहणारे विनोदभाई यांनी तक्रार दाखल केली आहे. विनोदभाई यांचे रेडक्रॉस भागात दुकान आहे. रविवारी (दि.१४) संशयित विनोदभाई यांच्या दुकानाच्या खिडकीचे गज कापताना मिळून आले. परिसरातील जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच व्यावसायिकांनी एकत्रित येत संशयितांना पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या हवाली केले.
----
कारखान्यातून ५० हजारांची केबल लंपास
नाशिक : बंद कारखान्यातून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीची केबल चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही घटना सीसीटीव्ही यंत्रणेत कैद झाली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश सावळीराम तिदमे (रा. बडदेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तिदमे यांचा अंबड औद्योगिक वसाहतीत राजहंस फेब्रिकेशन प्रा.लि. नावाचा कारखाना आहे. शनिवारी (दि.१३) कामगारांची साप्ताहिक सुट्टी असताना ही घटना घडली. कारखाना बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी अर्धवट लावलेल्या शटरमधून प्रवेश करीत ही चोरी केली. रविवारी ही घटना उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे केबलची चोरी करताना कैद झाले असून त्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या प्रकारची केबल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
----
चक्कर येऊन कोसळल्याने इसम ठार
नाशिक : उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात चक्कर येऊन कोसळल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संजय गंगाधर हांडवे (४३) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हांडवे रविवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास अचानक चक्कर येऊन आपल्या घरात पडले होते. या घटनेत ते बेशुध्द झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----
माडसांगवीत तरुणाची आत्महत्या
नाशिक : माडसांगवी ता.जि. नाशिक येथील ३८ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद बाबुराव जाधव असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांनी शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
--
.