‘स्ट्रॉँग’ नाकाबंदीतूनही हल्लेखोर निसटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:37 AM2019-06-16T01:37:23+5:302019-06-16T01:37:41+5:30
मुथूट फायनान्सच्या उंटवाडी येथील कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणारे हल्लेखोर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी सीसीटीव्हीत तांत्रिक बिघाड असल्यामुळे फुटेज तपासून वर्णन मिळविण्यात पोलिसांचा तासाभरापेक्षा अधिक वेळ वाया गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. परिणामी ‘स्ट्रॉँग’ नाकाबंदीतून हल्लेखोर दुचाकी, चारचाकींमधून शहराबाहेर निसटून जाण्यात यशस्वी ठरले.
नाशिक : मुथूट फायनान्सच्या उंटवाडी येथील कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणारे हल्लेखोर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी सीसीटीव्हीत तांत्रिक बिघाड असल्यामुळे फुटेज तपासून वर्णन मिळविण्यात पोलिसांचा तासाभरापेक्षा अधिक वेळ वाया गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. परिणामी ‘स्ट्रॉँग’ नाकाबंदीतून हल्लेखोर दुचाकी, चारचाकींमधून शहराबाहेर निसटून जाण्यात यशस्वी ठरले.
घटनेनंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. शहराअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क तेचे आदेश देत नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार सर्वत्र नाकाबंदी पाइंटवरील कर्मचारी सतर्क झाले. तसेच शहराच्या चारही बाजूंनी जिल्ह्यातून येणाºया एकूण १३ मार्गांवर ‘बॉर्डर सिलिंग’चे कायमस्वरूपी नाक्यांवरील कर्मचारीही पाळत ठेवून होते. सर्व नाकाबंदी पॉइंटवरून अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वाहन, हल्लेखोरांचे वर्णनाबाबत माहिती विचारली जात होती. मात्र तोपर्यंत अचूक वर्णन हाती नसल्यामुळे बिनतारी संदेश यंत्रावरून नाकाबंदी व गस्तीवरील पथकांना वर्णन देता आले नसल्याचे गुन्हे शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र जास्त वेळ हल्लेखोर तपासी पथकांपासून सुरक्षित राहू शकत नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
..अशी होती नाकाबंदी
१३ बॉर्डर सिलिंग पॉइंट : प्रत्येकी पाच असे एकूण ७० कर्मचारी सीमावर्ती नाक्यांवर.
शहरांतर्गत १८ नाके : प्रत्येक नाक्यावर एक अधिकारी, चार कर्मचाºयांसह २ वाहतूक पोलीस असे एकूण १३० पेक्षा अधिक कर्मचारी. प्रत्येक पोलीस ठाण्याचे सीआर मोबाइल, डीबी मोबाइल यांसह ४१ वाहनांद्वारे अधिकारी, कर्मचारी तसेच ३२ बीट मार्शल फिरत्या गस्तीवर होते.