तडीपार गुंडाचा पोलिसावर धारधार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:38 PM2019-04-20T13:38:20+5:302019-04-20T13:40:55+5:30
तडीपार केलेला संशियत गुन्हेगार कालेकर गंगाघाट रामकुंडावर लोकांना धमकावीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या आॅल आउट आॅपरेशनदरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर तडीपार गुंडाने गोदाकाठावर धारधार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. खून, खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत समावेश असलेल्या हनुमानवाडीतील तडीपार गणेश उर्फ बाला भास्कर कालेकर हा शस्त्राचा धाक दाखवून गोदाकाठावर दहशत माजविण्याच्या प्रयत्नात होता. त्यास पालिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर चाल केली; मात्र पोलिसांनी शिताफीने त्यास बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरु वारी रात्री पंचवटीत विशेष मोहीम राबविली जात होती. पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरलेला असताना तडीपार केलेला संशियत गुन्हेगार कालेकर गंगाघाट रामकुंडावर लोकांना धमकावीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरिक्षक योगेश उबाळे, सहाय्यक उपनिरीक्षक रमेश देशमाने, दिपक गिरमे, हवालदार शिवाजी आव्हाड, संतोष नवले, नवनाथ रोकडे आदींनी गंगाघाटावर धाव घेतली. तेव्हा संशियत कालेकर हनुमान मंदिराजवळ धारधार चाकूचा धाक दाखवून भाविकांना धमकावत असल्याचे त्यांना आढळले. पोलिसांना बघताच त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी गिरमे यांच्या हाती कालेकर लागला; मात्र त्याने स्वत:जवळील धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याशी झटापट करून निसटून जात असताना अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला जमिनीवर पाडून धरून ठेवत त्याच्या कब्जातील शस्त्र ताब्यात घेत कालेकरला बेड्या ठोकल्या. कालेकरवर शासकीय कामात अडथळा आणणे, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन, पोलिसांवर हल्ला अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश उबाळे करीत आहे.