'मी केवळ मराठा समाजाचं नेतृत्व करत नसून बहुजन समाजाला एकत्र आणायचा हा प्रयत्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:59 PM2021-06-21T12:59:08+5:302021-06-21T13:00:02+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल.
नाशिक - आपण इथं आलात, आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. नाशिकच्या पुण्य नगरीतून मी सांगू इच्छितो की, मी फक्त मराठ्यांचं नेतृत्व करत नाहीये, मी मराठा समाजाच्या माध्यमातून एक निमित्त आहे, शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे. संपूर्ण बहुजन समाजच कसा एकत्र राहू शकतो, हा माझा दृष्टीकोन आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले. नाशिकमधील आंदोलनात उपस्थितांशी बोलताना संभाजीराजेंनी बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. या आयोगाच्या माध्यमातून राज्यपाल, तिथून केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत... असाच पर्याय असल्याचे संभाजीराजेंनी नाशिकमध्ये बोलताना म्हटले. तसेच, राज्य सरकारच्या हातात असलेल्या आमच्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने करावी, असेही संभाजीराजेंनी म्हटले.
नाशिक येथे मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरूवात...
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2021
" समाज बोलला... आम्ही बोललो... लोकप्रतिनिधींनो, आता तुम्ही बोला... "#मराठा_आरक्षणpic.twitter.com/M5h1075jzX
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नाशिक शहरातील गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौकामध्ये थोरात सभागृहाच्या प्रारंगणात छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन पुकारले आहे. सोमवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजेपासून आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. या आंदोलनस्थळी विविध लोकप्रतिनिधी हजेरी लावत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान, ११ वाजता भुजबळ यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. त्यांनी संभाजीराजे यांची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आपली भूमिका स्पष्ट केली.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, सरकारचीही तीच भूमिका
मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी वारंवार केली जात आहे. त्यांची मागणी रास्त असून आमचादेखील या मागणीला पुर्वीपासून पाठिंबा राहिलेला आहे. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेनेसह सर्वांची हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या समाजालाही आरक्षणापासून वंचीत ठेवता कामा नये.