इगतपुरीत बस जाळण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 2, 2016 11:36 PM2016-02-02T23:36:26+5:302016-02-02T23:38:29+5:30
आंदोलन : समीर भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद
इगतपुरी : राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेचे इगतपुरी शहरात तीव्र पडसाद उमटले. अज्ञात इसमांनी महामंडळाच्या बसला लक्ष्य करून तिची तोडफोड करून ज्वलनशील रसायनाने बस जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
इगतपुरी शहरातील जुना मुंबई- आग्रा महामार्गावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास इगतपुरी डेपोची बस (एमएच १५ ईएफ ६८०२) कसाऱ्याहून प्रवाशांना घेऊन इगतपुरीकडे येत होती. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बॉम्बे जनरल स्टोअर्ससमोर बसचा वेग कमी झाला असता तोंडावर रुमाल बांधून आलेल्या दोन जणानी बसवर अचानक लाकडी दांडे घेऊन हल्ला केला. यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. बसच्या एका बाजूच्या सर्व खिडक्याच्या काचांवर लाकडी दांड्याने वार करीत वाहकाच्या समोरील काचदेखील फोडण्यात आली. दरम्यान, तोडफोड करत असताना एकाने ज्वलनशील रसायनाने बसच्या पुढील टायरवर टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात टायर जळताना पाहून नागरिकांनी आरडओरड सुरू केली. यामुळे या अज्ञात दोघानी पळ काढला. स्थानिक नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी घरातील पाणी आणून आग विझवली. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनचालक शिवनाथ खडके यांनी फिर्याद दिली आहे. बसचे ५० हजार रु पयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक एच. पी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)