गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची पळविण्याचा प्रयत्न
By admin | Published: August 9, 2016 12:31 AM2016-08-09T00:31:08+5:302016-08-09T00:31:19+5:30
सिन्नर पंचायत समिती : बीडीओ नसल्याने खुुर्चीला तक्रारी सांगायच्या का?
सिन्नर : गटविकास अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर पदभार कोणाकडेच नाही. तक्रारी काय खुर्चीला सांगायच्या का, असा संतप्त सवाल उपस्थित करीत पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करीत त्यांची खुर्ची खांद्यावर उचलून रस्ता धरला. काहीवेळात कर्मचाऱ्यांना सदर प्रकार माहीत झाल्यानंतर बैरागी यांच्या पाठीमागे पळत जात खुर्ची परत ताब्यात घेण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. या घटनेमुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली होती.
पांगरी येथील भाऊसाहेब नरहरी बैरागी यांनी गेल्या काही दिवसांपासून विहीर, घरकुल व अन्य घोटाळ्यासंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. बैरागी यांनी वेळोवेळी या प्रकरणांच्या चौकशीसाठी आंदोलने केली आहेत.
पांगरी येथील एका प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात गटविकास अधिकाऱ्यांना आदेश केले असल्याचे बैरागी यांचे म्हणणे आहे. मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास टाळटाळ व विलंब केला जात असल्याचे बैरागी यांचे म्हणणे आहे. या कारवाईसाठी बैरागी गेल्या काही दिवसांपासून सिन्नर पंचायत समितीत चकरा मारत होते.
येथील गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांची ४ आॅगस्ट रोजी बदली झाली. त्यांनी ६ तारखेला शनिवारी पदभार सोडला. त्यामुळे चार दिवसांपासून गटविकास अधिकाऱ्याचा पदभार कोणाकडे नव्हता. चकरा मारल्यानंतर कोणीच म्हणणे ऐकण्यासाठी नसल्याने बैरागी यांनी सोमवारी सकाळी सहाय्यक गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांची भेट घेतली. वाघ यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र दुपारी एक वाजेच्या सुमारास बैरागी यांच्या संयम सुटला.
गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात कोणीच नसल्याचे पाहून बैरागी यांनी त्यांची लाकडी खुर्ची खांद्यावर उचलून घेतली. बैरागी खुुर्ची घेवून तडक पंचायत समितीच्या बाहेर निघाले. त्यानंतरही सदर प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. बैरागी थेट मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पोहचल्यानंतर कर्मचाऱ्यांचा सदर प्रकार लक्षात आला.
कर्मचारी गणपत जाधव बैरागी यांच्या मागे पळत गेले व खुर्ची ताब्यात घेतली.पंचायत समितीतून गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची पळविण्याचा प्रकार झाल्याचा फोन गेल्यानंतर सिन्नर पोलिसांनी तात्काळ पंचायत समितीत धाव घेतली. त्यांनी बैरागी व अन्य दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. मात्र सायंकाळपर्यंत बैरागी यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही न आल्याने पोलिसांनी बैरागी यांनी सोडून दिले. (वार्ताहर)