पंचवटीत दरोड्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:11 AM2018-03-06T01:11:49+5:302018-03-06T01:11:49+5:30
दरोड्याच्या तयारीसाठी पेठरोडवरील कालव्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर एकत्र येऊन दबा धरून बसलेल्या टोळीचा प्रयत्न पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या जागरूकतेमुळे फसला. तिघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.४) मध्यरात्री अटक केली आहे.
पंचवटी : दरोड्याच्या तयारीसाठी पेठरोडवरील कालव्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर एकत्र येऊन दबा धरून बसलेल्या टोळीचा प्रयत्न पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या जागरूकतेमुळे फसला. तिघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.४) मध्यरात्री अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.४) रात्री १० वाजता पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, पोलीस हवालदार विलास बस्ते, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, सचिन म्हस्दे आदी पेठरोड परिसरात गस्त घालत असताना पेठरोडवरील पाटाजवळ एका झोपडीच्या मागे फुलेनगर येथील संशियत आरोपी प्रवीण अरुण लोखंडे (३०), दीपक किसन चोथवे (३०), राहुल पवार, विकी उर्फ टेंभºया भुजबळ व त्यांचा अन्य एक साथीदार यांची टोळी दबा धरून बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले.
पोलिसांनी लोखंडे व चोथवे या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहे; मात्र त्यांच्या मागावरही पथक असून, त्यांनाही अटक केली जाणार असल्याचे बर्डेकर यांनी सांगितले. परिसरातील हे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.