‘पबजी गेम’च्या व्यसनामुळे मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:59 AM2019-03-17T00:59:06+5:302019-03-17T00:59:25+5:30
युवकांना वेड लावणाऱ्या पबजी व्हिडिओ गेमचे लोन नाशिकमध्येही चांगलेच पसरले असून, अनेक तरुण तासनतास या गेममुळे मोबाइलमध्येच डोके घालून बसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते. हाच गेम खेळताना आईने मोबाइल काढून घेतला म्हणून रागाच्या भरात एका चौदा वर्षीय मुलाने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे शुक्रवारी (दि. १५) घडली
सातपूर : युवकांना वेड लावणाऱ्या पबजी व्हिडिओ गेमचे लोन नाशिकमध्येही चांगलेच पसरले असून, अनेक तरुण तासनतास या गेममुळे मोबाइलमध्येच डोके घालून बसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते. हाच गेम खेळताना आईने मोबाइल काढून घेतला म्हणून रागाच्या भरात एका चौदा वर्षीय मुलाने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे शुक्रवारी (दि. १५) घडली असून, आकाश महेंद्र ओस्तवाल (१४) असे या युवकाचे नाव आहे.
सातपूरमधील शिवाजीनगर येथील आकाश महेंद्र ओस्तवाल हा सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या आईच्या मोबाइलमध्ये पबजी गेम खेळत होता.
त्याचवेळी चांदवड येथे होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलीने आईसोबत बोलण्यासाठी फोन केला. आईने आकाशच्या हातातून मोबाइल घेतला. गेम खेळतांना लेव्हल अपूर्ण राहिल्याचा राग आल्याने त्याने घराबाहेर पडून अज्ञात ठिकाणावरून ‘डेल्टा मैत्रिग’ प्रकाराचे विषारी औषध आणून, ते घरामध्ये प्राशन केले. त्यामुळे त्याला उलट्या होऊ लागल्या व तो बेशुद्ध पडल्याने त्याला शिवाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल केले. त्याची अवस्था गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला ७२ तासांच्या निगराणीखाली ठेवले आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.