आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:01 AM2018-07-27T00:01:09+5:302018-07-27T00:13:08+5:30
नाशिक : जिल्ह्णात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू आहे. परंतु, जिल्हा प्रशासन आंदोलनाला परवानगी नाकारून मोर्चा समन्वयकांना नोटिसांवर नोटिसा पाठवत आहेत. मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि. २६) पत्रकार परिषदत केला आहे.
नाशिक : जिल्ह्णात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू आहे. परंतु, जिल्हा प्रशासन आंदोलनाला परवानगी नाकारून मोर्चा समन्वयकांना नोटिसांवर नोटिसा पाठवत आहेत. मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि. २६) पत्रकार परिषदत केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारपासून पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला जिल्हा प्रशासन, पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आवारात आंदोलनास सुरुवात केली.
परंतु येथेही केवळ दुपारी २ वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी दिली. परंतु आंदोलक ठिय्या आंदोलनावर ठाम राहिल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक शहर, नाशिकरोड परिसर आणि उपनगरांमध्ये बुधवारी (दि. २५) आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटल्याने गुरुवारी ठिय्या आंदोलनासाठी आंदोलकांपेक्षा अधिक संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रशासन आणि सरकारचा निषेध करीत यापुढे गनिमी काव्याने आंदोलन करण्याची माहिती दिली. तसेच यापुढील आंदोलनाचे नेतृत्व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयक करणार असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी करण गायकर, तुषार जगताप, मधुकर कासार, राजू देसले, उमेश शिंदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने आदी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सानप यांच्या निवासस्थानी उद्या आंदोलन मराठा क्रांती मोर्चाला आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे यापुढे शहरातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन कण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. या आंदोलनात सर्वप्रथम सत्ताधारी पक्षाचे आमदार तथा शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरासमोर शनिवारी (दि. २८) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांनी दिली आहे. आंदोलकांची गळचेपीमराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना परवानगी नाकारून जिल्हा प्रशासन आणि सरकार आंदोलकांची गळचेपी करीत असल्याचा आरोप मोर्चा समन्वयकांनी के ला आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात येणाऱ्या आंदोलनाची जागा नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाची आहे. त्यामुळे या ठिकाणी परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नसतानाही जिल्हा प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारून आंदोलकांना उकसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे.