'फोन पे'द्वारे दुकानदाराच्या फसवणुकीचा प्रयत्न; वेळीच व्हा सावध अन्यथा बसू शकतो मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:17 PM2022-08-29T18:17:11+5:302022-08-29T18:19:44+5:30
सिन्नर तालुक्यातील वावी गावात बसस्थानकाजवळ संतोष बाळकिसन जोशी यांचे अवधूत मशिनरी स्टोअर्स आहे. शनिवारी (दि.२७) दुपारी एक वाजेच्या सुमारास ...
सिन्नर तालुक्यातील वावी गावात बसस्थानकाजवळ संतोष बाळकिसन जोशी यांचे अवधूत मशिनरी स्टोअर्स आहे. शनिवारी (दि.२७) दुपारी एक वाजेच्या सुमारास एक इसम व एक महिला दुकानात आले. त्यांनी जोशी यांच्याकडे औषध मारण्याचा बॅटरी पंप विकत घ्यायचा आहे असे सांगून एक बॅटरीवरील पंप विकत घेतला. त्याचे २७५० रुपये फोन पेला सेंड करतो असे सांगून २७५० रुपये जोशी यांच्या खात्यावर सेंड न करता इतर कोणाच्या तरी खात्यावर सेंड करून त्याचा स्क्रिन शॉट दाखवला. पैसे सेंड केले आहे असे सांगून दुकानातून निघून जात असताना जोशी यांनी त्यांना आवाज देऊन पैसे सेंड झाले नाही असे सांगत असताना ते त्यांच्या मोटर सायकलवर बसून जोरात निघून गेले. तेव्हा जोशी यांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेज काढून वावी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना आणून दिले.
कोते यांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले. सदरचे फुटेज स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद टिळे यांनी पाहिल्याने त्यांना सदर महिलेला ओळखले. पोलिसांनी सदर महिलेच्या घरी जाऊन खात्री केली असता ते आढळून आले नाही. मात्र, त्या महिलेला व इसमास पोलीस घरी आल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी पुन्हा वावी येथे येऊन अवधूत मशिनरी स्टोअर्समध्ये जाऊन जोशी यांचे बॅटरी पंपाचे २७५० रुपये दिले. सदर इसम व महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
संतोष जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित मयूर केशव कार्ले (२८) रा. कसारे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर व शारदा संतोष आराध्ये (२७) रा. वंडर सिटी, सिल्व्हर जुबली शाळेच्या जवळ, सरदवाडी रोड, सिन्नर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानदाराचे प्रसंगावधान, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांची तत्परता यामुळे दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात व दुकानदाराचे पैसे मिळून देण्यात पोलिसांना यश आले.