दुचाकी चोरांची टोळी अटकेत
By admin | Published: October 18, 2016 01:17 AM2016-10-18T01:17:40+5:302016-10-18T01:41:50+5:30
मालेगाव : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १६ दुचाकी जप्त
मालेगाव : जिल्ह्यातून मालेगाव, चांदवड येथून नवरात्रोत्सव काळात दुचाकी चोरणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली. मालेगावी छावणी परिसर, मेनरोड तसेच चांदवड येथून नवरात्रोत्सव काळात रेणुकामाता मंदिर परिसर आणि नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणातून दुचाकी चोरीस गेल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील पाटणे व टेहरे परिसरात दुचाकी चोर बनावट नंबर प्लेट वापरून कमी किमतीत दुचाकी विकत असल्याचे समजल्यावरून हवालदार सुनील अहिरे, सुहास छत्रे, विकास शिरोळे, राजू मोरे, वसंत महाले, पोलीस नाईक राकेश उबाळे, रतिलाल वाघ यांच्या पथकाने टेहरे बसस्थानक परिसरात सापळा लावून संशयित चोरटे देवा दादाजी मेहंदळे व प्रदीप बापू सूर्यवंशी, रा. टेहरे यांना अटक केली. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांचा साथीदार पंढरीनाथ मुरलीधर खैरनार, रा.पाटणे या तिघा आरोपींनी मालेगाव, संगमेश्वर, छावणी, चांदवड, धुळे, कल्याण व नाशिक परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून टेहरे व पाटणे परिसरात छापे टाकून चार लाख एक हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)