मराठवाड्याचे पाणी अडविण्याचा प्रयत्न, नाशिकमध्ये सर्वपक्षीयांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 03:51 AM2018-10-27T03:51:33+5:302018-10-27T03:51:43+5:30
मराठवाड्याला पाणी सोडण्यास नाशिकमध्ये मोठा विरोध होत असून, दारणा धरण समूहातून सोडलेले पाणी अडविण्याचा शुक्रवारी प्रयत्न झाला.
घोटी (नाशिक) : मराठवाड्याला पाणी सोडण्यास नाशिकमध्ये मोठा विरोध होत असून, दारणा धरण समूहातून सोडलेले पाणी अडविण्याचा शुक्रवारी प्रयत्न झाला. पोलिसांनी शिवसेनेने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह दीडशे शिवसैनिक व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केले. भावली धरणातून सोडलेले पाणी रोखण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
नगरमध्येही वाढता विरोध
भंडारदरा, मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी नगर जिल्ह्यातही वाढता विरोध आहे. शुक्रवारी दिवसभर प्रशासकीय पातळीवर पाणी सोडण्याबाबत जोरदार तयारी सुरू होती. नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठाही खंडित केला जाणार आहे.
भंडारदरातून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी तातडीने थांबवा आणि तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, अशी अकोले सर्वपक्षीय कृती समितीने तहसीलदार, जलसंपदा विभागाकडे केली. शनिवारी अकोले तालुका बंदची हाक देण्यात आली. रविवारी भंडारदराचे ‘चाक बंद’ आंदोलन व सोमवारी तहसील कचेरी ताब्यात घेण्याचा ‘सत्याग्रह’ असे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिकारी आडवे आल्यास त्यांनाही आडवे करू, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला.
शनिवारी दुपारपर्यंत ‘मुळा’ धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
>जायकवाडीसाठी सोमवारी पाणी सोडणार
सोमवारी जिल्ह्यातील तीनही धरण समूहातून पोलीस बंदोबस्तात व वीजपुरवठा खंडित करून पाणी सोडण्यात येणार आहे.