आदिवासी बांधवांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:25+5:302021-08-24T04:19:25+5:30
अनुसूचित जमाती कल्याण समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असून आदिवासी समाजाचे नेते तुकाराम मेंगाळ व माजी उपसरपंच बस्तीराम आगीवले ...
अनुसूचित जमाती कल्याण समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असून आदिवासी समाजाचे नेते तुकाराम मेंगाळ व माजी उपसरपंच बस्तीराम आगीवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार दौलत दरोडा यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले.
नांदुरशिंगाटे येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच व अन्य पदाधिकारी यांनी जाणूनबुजून आपल्या पदाचा दुरुपयोग करत खोटी व बनावट माहिती प्रशासनास सादर केली आहे. जाणीवपूर्वक आदिवासी बांधव व इतर नागरिकांना शासकीय अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाकडील प्रोसिडिंगवरील विषय क्र. ९ ठराव क्र. ८२ मधील खोटी व बनावट माहिती वरिष्ठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्या संदर्भात जिवंत लोक मयत दाखविले आहे, ज्या व्यक्ती कायमस्वरूपी स्थानिक रहिवासी आहेत, त्यांना स्थलांतरित दाखविले व ज्या व्यक्ती भूमिहीन किंवा अल्पभूधारक आहेत त्यांच्या नावे अधिक क्षेत्र दाखविण्यात आले असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी निवेदनात केला आहे.
याबाबत पंचायत समिती स्तरावरून चौकशी करून त्यांचे जबाबही प्रशासनास प्राप्त झाले आहे. संपूर्ण अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित ग्रामसेवक, सरपंच व इतर पदाधिकारी यांच्यावरती आठ दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजतागायत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.
या फसवणुकीच्या प्रकरणातील ग्रामसेवक, सरपंच व इतर पदाधिकारी यांचेवर योग्य ती कार्यवाही करून यांची पदे बरखास्त करण्यात यावी व सर्व आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सह्याद्री मंडळाचे तालुका अध्यक्ष अजय कडाळे, संघर्ष ग्रुपचे संदीप शेळके, गंगाराम मेंगाळ, निवृत्ती डोके, मनोहर आगीवले, राजेंद्र पथवे, शिवाजी आगीवले, भास्कर मेंगाळ, रामनाथ गिर्हे, भीमा गिर्हे, पांडुरंग आगीवले, कुंडलिक मेंगाळ आदिवासी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(२३ निवेदन)
आमदार दौलत दरोडा यांना मागण्यांचे निवेदन देताना तुकाराम मेंगाळ, बस्तीराम आगीवले आदी.
230821\23nsk_22_23082021_13.jpg
आमदार दौलत दरोडा यांना मागण्यांचे निवेदन देतांना तुकाराम मेंगाळ, बस्तीराम आगिवले आदी.