दखणी-मोमीन वाद पेटविण्याचा प्रयत्न
By Admin | Published: April 25, 2017 01:34 AM2017-04-25T01:34:54+5:302017-04-25T01:35:06+5:30
महापालिका स्थापनेला १७ वर्षे उलटूनही शहराचा बकालपणा, रखडलेला विकास, शहरातील नागरी समस्या ‘जैसे थे’च आहे.
अतुल शेवाळे मालेगाव
महापालिका स्थापनेला १७ वर्षे उलटूनही शहराचा बकालपणा, रखडलेला विकास, शहरातील नागरी समस्या ‘जैसे थे’च आहे. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणासाठी जुनाच दखणी-मोमीन वाद पेटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मतदार या राजकीय खेळीला किती महत्त्व देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शहराच्या पूर्व भागात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल अशीे सरळ लढत होत असून, एमआयएम या तिन्ही पक्षांपुढे आव्हान उभे करणार आहे. शहराच्या पूर्व भागात सध्या जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरदार सभा होत आहेत. सभांना गर्दीदेखील होत आहे. या सभांमध्ये विकासाचा मुद्दा चर्चिला जाणे अपेक्षित होते. राष्ट्रवादी व जनता दलाने गेल्या काही वर्षांत नागरिकांसाठी कोणती ठोस कामे केली हे मतदारांना पटविणे गरजेचे असताना काँग्रेस व इतर पक्षांना कोंडीत पकडण्यासाठी बिरादरीचा वाद उकरून काढला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दलाची मनपा निवडणुकीत युती झाली असली तरी दोघा पक्षांच्या नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी शीतयुद्ध सुरू आहे. एकमेकांमध्ये कोण सरस आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिका स्थापनेला १७ वर्ष व तीन पंचवार्षिक निवडणुका होऊनही शहरातील नागरिक प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहेत. या प्रश्नांवर बोलण्याऐवजी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून जातपात व वैयक्तिक टीकेवर भर दिला जात आहे. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला यश आल्यानंतर अडीच वर्षे काँग्रेसकडे महापौरपद होते. त्यानंतर आमदारकीही मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात टाकली. असे असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून मतदारांना बुमरँग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रारंभी एमआयएम पक्ष प्रमुख विरोधकाची भूमिका बजावेल अशी चिन्हे दिसत होती; मात्र सध्यस्थितीत एमआयएम काही वॉर्डांपुरताच सीमित राहिल्याचे दिसून येत आहे. पाच ते सहा प्रभागांमध्येच एमआयएमकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागात काँग्रेस-राष्ट्रवादी-जनता दल अशी तिरंगी लढत होणार आहे.