नाशिक ‘सायकल कॅपिटल’ बनविण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:34 AM2018-09-23T00:34:50+5:302018-09-23T00:35:09+5:30
वाइन कॅपिटल त्याचबरोबर धार्मिक शहर, अशी ओळख असलेल्या नाशिक शहराची आता सायकल चळवळीमुळे वेगळी ओळख पुढे येत आहेच, त्यालाच अनुसरून महापालिकेनेदेखील आता ‘सायकलींचे शहर’ ही ओळख पुढे नेण्यासाठी शेअर सायकलिंगवर भर दिला असून, येत्या दिवाळीपर्यंत पाचशे, तर पुढील जून महिन्यापर्यंत एक हजार सायकली भाड्याने वापरता येऊ शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक : वाइन कॅपिटल त्याचबरोबर धार्मिक शहर, अशी ओळख असलेल्या नाशिक शहराची आता सायकल चळवळीमुळे वेगळी ओळख पुढे येत आहेच, त्यालाच अनुसरून महापालिकेनेदेखील आता ‘सायकलींचे शहर’ ही ओळख पुढे नेण्यासाठी शेअर सायकलिंगवर भर दिला असून, येत्या दिवाळीपर्यंत पाचशे, तर पुढील जून महिन्यापर्यंत एक हजार सायकली भाड्याने वापरता येऊ शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती शनिवारी (दि.२२) वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाच्या वेळी दिली. शनिवारी जागतिक वाहन विरोधी दिन असल्याने नाशिक सायकलिस्टच्या वतीने आयुक्तांची याच ठिकाणी भेट घेण्यात आली आणि वाइन कॅपिटलप्रमाणेच नाशिकची ओळख सायकल कॅपिटल म्हणून व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावेळी मुंढे यांनी माहिती दिली.
आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंगची चळवळ वाढत असून, शहरात सायकलिंग करणारे ग्रुप तयार झाले आहेत. राज्यात सर्वाधिक सायकली नाशिक शहरात विकल्या जातात, असे नाशिक सायकलिस्ट या संस्थेच्या वतीने किरण चव्हाण यांनी सांगितले. महापालिकेनेदेखील पर्यावरणाच्या दृष्टीने नॉन मोटार व्हेईकल म्हणून सायकल चालविणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत शेअर सायकलिंगवर भर दिला आहे. महापालिकेने खासगीकरणातून ही सेवा देण्याचे कंत्राट दिले असून, पुढील महिन्यापासून काम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० सायकली उपलब्ध होणार असून, पाचशे सायकली दिवाळीपर्यंत उपलब्ध होईल, तर आगामी जून महिन्यापर्यंत एक हजार सायकली शेअरिंगसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. अॅपद्वारे सायकल बुकिंग, आॅनलाइन पेमेंट आणि जीपीएस ट्रॅकिंग अशाप्रकारची अद्ययावत सेवा असणार आहे.