आंतरजातीय विवाहामुळे सवलती बंद करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 01:38 AM2022-05-07T01:38:58+5:302022-05-07T01:40:16+5:30
त्र्यंबकेश्वर : इगतपुरी तालुक्यातील रायांबे या गावातील एका युवतीने कुटुंबीयांचा विरोध झुगारून आंतरजातीय विवाह केल्यानंतर सदर युवतीकडून ग्रामपंचायतीने सदर ...
त्र्यंबकेश्वर : इगतपुरी तालुक्यातील रायांबे या गावातील एका युवतीने कुटुंबीयांचा विरोध झुगारून आंतरजातीय विवाह केल्यानंतर सदर युवतीकडून ग्रामपंचायतीने सदर विवाहामुळे यापुढे अनुसूचित जमातीच्या कुठल्याही शासकीय-निमशासकीय योजनांचा लाभ घेणार नाही, असे बळजबरीने लिहून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सदर सरपंचासह संबंधित जातपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील रायांबे या गावातील एका युवकाने आंतरजातीय विवाह केला.
दोघेही सज्ञान असून आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला असला तरी आम्हा नवदाम्पत्यास तो मान्य असल्याचे युवतीने म्हटले आहे. सदर युवती ही वाळविहीर ता. इगतपुरी येथील आहे. तर मुलगा रायांबे ता. इगतपुरी येथील रहिवासी आहे. दोघेही लग्न करून गुरुवारी घरी रायांबे येथे आले असताना मुलगी ज्या समाजाची आहे, त्यांचे पित्त खवळले. त्यांनी मुलगा आणि मुलीला बोलावून घेतले. त्यांना दमदाटी करण्यात आली आणि गावातील दोन्हीही समाजाच्या लोकांसमोर मुलीकडून लेखी पत्र घेण्यात आले. सदर आंतरजातीय विवाहामुळे यापुढे अनुसूचित जमातीसाठी मिळणाऱ्या सरकारी सवलती घेणार नाही असे लेखी घेऊन त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. विशेष म्हणजे सदर पत्रावर ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा शिक्काही मारण्यात आला. त्यामुळे
खळबळ उडाली आहे. हा सरळसरळ राज्यघटनेला आव्हान देण्याचा प्रकार असून कोणाच्याच जाती बदलण्याचा अगर सवलती बंद करण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यामुळे सदर युवतीला शासनाने संरक्षण द्यावे व सरपंचपदाचा गैरवापर केल्याने कायदेशीर कारवाईची मागणी भगवान मधे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
कोट....
जातीयता नष्ट होण्यासाठी सरकार अशा आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देते. त्यांना संसारोपयोगी मदत तसेच रोख रक्कम देण्यात येते. येथे तर आपल्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या अधिकाराचा गावच्या सरपंचाने गैरवापर केला आहे. यासाठी त्यांचे सरपंचपद रद्द करून जातपंचायतीवर गुन्हा दाखल करावा.
- उमेश सोनवणे, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, त्र्यंबकेश्वर