इच्छुकांच्या गाठीभेटींना आला वेग

By Admin | Published: January 5, 2017 11:27 PM2017-01-05T23:27:56+5:302017-01-05T23:28:12+5:30

राजकीय ‘उष्मा’ वाढला : नववर्षाच्या शुभेच्छांवर अजूनही भर

Attendees come to visit | इच्छुकांच्या गाठीभेटींना आला वेग

इच्छुकांच्या गाठीभेटींना आला वेग

googlenewsNext

 रमेश देसले ठेंगोडा
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गटात मतदारांच्या गाठीभेटी घेत आपणच उमेदवारीसाठी कसे योग्य आहोत हे पटवून देत जंग जंग पछाडत गटातील राजकीय वातावरण ऐन थंडीच्या मोसमातही गरम झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच नववर्षाच्या निमित्ताने जनतेसमोर जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गटातील गावागावांत नववर्षाच्या शुभेच्छांचे बॅनर लावत, तर काहींनी सोशल मीडियाच्या (व्हॉट्सअ‍ॅप) माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. अंदाजे ४० हजार लोकसंख्या असलेल्या ठेंगोडा गटाची मतदार संख्या २८,५०० आहे. जिल्हा परिषद गटात मुंजवाड व ठेंगोडा हे दोन गण येतात. ठेंगोडा गणाची मतदार संख्या १३,००० व मुंजवाड गणाची मतदार संख्या १४,५०० इतकी आहे .
२००५ च्या निवडणुकीत ठेंगोडा गट आरक्षित झाल्याने त्यांनी नवख्या असलेल्या वीरगाव गटात आपल्या सौभाग्यवती संगीता पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन निवडून आणले होते. राजकीय वजनामुळे पहिल्यांदाच निवडून येऊनदेखील संगीता पाटील यांना जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापतिपद मिळाले होते. त्यानंतर झालेल्या २०११ च्या निवडणुकीत यशवंत पाटील यांना वीरगाव व ठेंगोडा दोन्ही गट उमेदवारीसाठी खुले झाल्याने त्यांनी स्वगृही म्हणजे आपला हक्काचा गट म्हणून ठेंगोडा गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे यशवंत पाटील, राष्ट्रवादीचे शैलेश सूर्यवंशी, शिवसेनेचे अ‍ॅड. वसंत सोनवणे, मनसेचे सुरेश मोरे अशी चौरंगी लढत झाली होती.
या लढाईत यशवंत पाटील यांच्या सौभाग्यवती व माजी महिला बालकल्याण सभापती संगीता पाटील, विद्यमान जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्या पत्नी हेमलता सूर्यवंशी, शिवसेनेचे उमेदवार असलेले अ‍ॅड. वसंत सोनवणे यांच्या पत्नी व माजी पं. स. सदस्य संगीता सोनवणे व मनसेचे उमेदवार राहिलेले सुरेश मोरे यांच्या पत्नी मीनाताई मोरे यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे.
पाटील यांनी त्यादृष्टीने गटात संपर्क वाढवत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याने चौरंगी वाटत असलेली ही निवडणूक पंचरंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र यशवंत पाटील व प्रा. अनिल पाटील हे दोन्ही काँग्रेस पक्षाचे असल्याने पक्ष कुणाला अधिकृत उमेदवारी देणार याबाबत गटात चर्चा रंगत आहे.

Web Title: Attendees come to visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.