कोवळ्या जीवासह बैठकीस उपस्थित राहून महिला सरपंचांनी दर्शविली विकासाप्रती निष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:04 IST2021-06-29T22:38:30+5:302021-06-30T01:04:20+5:30
किसन काजळे नांदूरवैद्य : गावाच्या विकासासाठी आतापर्यंत कोणी विविध प्रकारे योगदान दिले असेल तर कोणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ...

मायदरा-धानोशी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला उपस्थित सरपंच पुष्पा बांबळे. समवेत ग्रामसेवक नितेश हेंबाडे, साहेबराव बांबळे, गंगाराम करवंदे आदी.
किसन काजळे
नांदूरवैद्य : गावाच्या विकासासाठी आतापर्यंत कोणी विविध प्रकारे योगदान दिले असेल तर कोणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या विहिरीतील पाणी दिले असेल; परंतु गावाच्या विकासकामांबाबत आयोजित महत्त्वाच्या मासिक बैठकीसाठी चक्क अवघ्या नऊ दिवसांच्या गोंडस बाळासह हजेरी लावून इगतपुरी तालुक्यातील मायदरा-धानोशी येथील सरपंच पुष्पा बांबळे यांनी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का दिला.
इगतपुरी तालुक्यातील मायदरा, धानोशी, ठोकळवाडी या ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत विविध विकासकामांबाबत मासिक बैठकीचे आयोजन ग्रामसेवक नितेश हेंबाडे व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते; परंतु या बैठकीला सरपंच हजर राहणार नाहीत, असे याआधीच घोषित करण्यात आले असल्यामुळे बैठकीला सुरुवात करण्याचे ठरले; परंतु काही वेळातच सरपंच पुष्पा बांबळे य ओल्या बाळंतीण आपल्या नऊ दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन बैठकीला हजर होताच उपस्थित ग्रामसेवक, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले.
सरपंच बांबळे आसनस्थ झाल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. या नियोजित बैठकीत शिवार रस्ता वीज, पाणी, दलित वस्तीतील विकास कामे, घरकुल योजना आढावा, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ग्रामसेवक नितेश हेंबाडे, चंद्रभागा केवारे, लंकाबाई बांबळे, गंगाराम करवंदे, साहेबराव बांबळे, बहिरु केवारे, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख धोंगडे, रंगनाथ लोहकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावाच्या विकासकामांबाबत महत्त्वाची बैठक असल्याने उपस्थित राहणे गरजेचे होते. गावासाठी कुठलीही परिस्थिती असो, मागे-पुढे न पाहता आपण गाव विकासासाठी सदैव तत्परता दाखवली असून, यापुढेही याच उत्साहाने कार्यरत राहीन.
- पुष्पा बांबळे, सरपंच, मायदरा-धानोशी.