आयोगाचे असणार प्रत्येक ईव्हीएमवर लक्ष
By श्याम बागुल | Published: September 1, 2018 02:40 PM2018-09-01T14:40:54+5:302018-09-01T14:44:55+5:30
आयोगाच्या या कृतीमुळे ईव्हीएम यंत्रातील हेराफेरी वा छेडछाडीच्या संभाव्य टिकेलाही प्रत्युत्तर देणे सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाने यापुर्वीच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली सर्व ईव्हीएम यंत्रे परत बोलावून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन यंत्राचा वापर शिवाय त्याला व्हीव्हीपॅटने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणाही आयोगाने करून व्हीव्हीपॅट वापराचे फायदेही मतदारांना सांगण्यास सुरूवात केली आहे.
नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरूवात झालेली असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला कोणतीही बाधा पोहोचू नये यासाठी निवडणूक आयोगाने आत्तापासूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलायला सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन ईव्हीएम यंत्राला बारकोड क्रमांक देण्याबरोबरच यंत्र ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉँगरूमला अक्षांश-रेखांशने जोडून प्रत्येक मतदान यंत्रावर बारकाईने नजर ठेवण्याची प्रक्रिया राबविली आहे. आयोगाच्या या कृतीमुळे ईव्हीएम यंत्रातील हेराफेरी वा छेडछाडीच्या संभाव्य टिकेलाही प्रत्युत्तर देणे सोपे झाले आहे.
निवडणूक आयोगाने यापुर्वीच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली सर्व ईव्हीएम यंत्रे परत बोलावून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन यंत्राचा वापर शिवाय त्याला व्हीव्हीपॅटने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणाही आयोगाने करून व्हीव्हीपॅट वापराचे फायदेही मतदारांना सांगण्यास सुरूवात केली आहे. सर्व विरोधीपक्षांकडून गेल्या काही वर्षापासून आयोगावर ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप होत असून, ते धुवून काढण्यासाठी आयोगाने नवनवीन पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. सध्या आयोगाकडून प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी जिल्ह्या-जिल्ह्यांना नवीन बॅलेट व कंट्रोल युनिटचे वाटप केले जात आहे. ज्या ज्या जिल्ह्यांना ही यंत्रे मिळाली त्या यंत्रावर बारकोड टाकण्यात आले असून, सदरच बारकोडचे स्कॅनिंग करून ते आयोगाच्या साईटवर टाकण्याची सक्ती करण्यात आली आहे. जेणे करून कोणत्या मतदार संघासाठी कोणत्या क्रमांकाचे मतदान यंत्राचा वापर होणार आहे याची माहीती आयोगाला त्यांच्या दिल्लीस्थित कार्यालयात बसून कळणार आहे. याशिवाय या मतदान यंत्राशी कुठल्याही प्रकारची छेडछाड अथवा हेराफेरी होवू नये याची देखील आयोगाने काळजी घेतली असून, ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम ठेवण्यात आले, त्या स्ट्रॉँगरूमचे लोकेशन देखील आयोगाने मागविले आहे. त्यासाठी मतदान यंत्र ठेवलेले गोदाम अथवा सभागृहाचे अक्षांश-रेखांश जीपीएसच्या माध्यमातून आयोगाकडे पाठविण्यात आले असून, आयोगाचे अधिकारी दिल्लीहून सदरचे गुदाम, सभागृहावर लक्ष ठेवू शकणार आहे.
निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्राबाबत घेतली जात असलेली खबरदारी पाहता, त्याच धर्तीवर जिल्हा पातळीवर देखील आता निवडणूक शाखेने प्रत्येक ईव्हीएम यंत्राची बारकोडींगद्वारे स्थानिक पातळीवर माहिती संकलित करण्यात आली असून, जेणे करून कोणते यंत्र कोणत्या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर वापरण्यात आले ते पाहणे सोपे होणार आहे.