सुपर स्पेशालिटी, आयुर्वेदकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:06 AM2018-08-27T01:06:55+5:302018-08-27T01:07:22+5:30

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचा विस्तार आणखी वाढविण्याचा विचार असून, संस्थेने भावी योजनांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह हॉर्टिकल्चर महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मूकबधिरांसाठी महाविद्यालय, महिला महाविद्यालय यांसह भारतीय शिक्षणाचा शैक्षणिक वारसा संग्रहालयाचा समावेश केला आहे.

Attention to Super Specialty, Ayurveda | सुपर स्पेशालिटी, आयुर्वेदकडे लक्ष

सुपर स्पेशालिटी, आयुर्वेदकडे लक्ष

googlenewsNext

नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या वैद्यकीयशिक्षण क्षेत्राचा विस्तार आणखी वाढविण्याचा विचार असून, संस्थेने भावी योजनांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह हॉर्टिकल्चर महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मूकबधिरांसाठी महाविद्यालय, महिला महाविद्यालय यांसह भारतीय शिक्षणाचा शैक्षणिक वारसा संग्रहालयाचा समावेश केला आहे. यातील भारतीय शिक्षणाचे शैक्षणिक वारसा संग्रहालयाचे काम पुढील वर्षात पूर्ण होणार असून, या कामांच्या नियोजनासाठी २०१८-१९ या वर्षासाठी सुमारे साडेसहाशे कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली दिली आहे.  मविप्रची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रावसाहेब थोरात सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. २६) खेळीमेळीत पार पडली. व्यासपीठावर माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्यासह संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती काशिराम अहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, उत्तम भालेराव, दत्तात्रय पाटील, नामदेव महाले, प्रल्हाद गडाख, दिलीप पाटील, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. जयंत पवार, हेमंत वाजे, रायभान काळे, सचिन पिंगळे, विश्राम निकम, रायभान काळे, नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, नंदा सोनवणे, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.  यावेळी संस्थेच्या अहवाल काळातील कामकाजाचा आढावा सभासदांसमोर मांडताना संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सभासदांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली. तसेच संस्थेच्या भावी योजना व नियोजनाविषयीही त्यांनी सभासदांना माहिती दिली. काही सभासदांनी भरलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी संस्थेला वकिलांची फी आणि न्यायालयीन खर्चावर सुमारे ४१ लाख १८ हजार रुपयांचा खर्च आल्याची माहिती समोर आल्याने संतप्त सभासदांनी संस्थेला खर्चात टाकणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द करून संबंधितांकडून वसूल करावा, अशी मागणी सभासदांनी केली आहे. तर काही सभासदांनी अंतर्गत वाद मिटविण्यासाठी समजोता समिती स्थापन करण्याचा पर्याय सुचविल्याने या संबंधी कार्यकारिणी लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तासह अन्य सर्व सात विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिल्याने सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी श्रीराम शेटे, अ‍ॅड. पंडितराव पिंगळे, शिरीषकुमार कोतवाल, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, अ‍ॅड. भास्करराव पवार, डॉ. भाऊसाहेब मोरे, अरविंद कारे, शरद कोशिरे, अ‍ॅड. रवींद्र पगार, रामचंद बापू पाटील आदींसह सभासद उपस्थित होते.
६४ कोटी ९६ लाख रुपयांच्या ठेवी
मविप्रमधील शिक्षकांच्या वेतनासह विविध महाविद्यालये व शाखांवर होणारा खर्च यासाठी संस्थेने आर्थिक तरतूद म्हणून तब्बल ६४ कोटी ९६ लाख ५७ हजार ८७९ रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. यात टीडीआरसाठी २१ कोटी ५० लाख, वेतनासाठी २३ कोटी ५८ लाख ५० हजार ५७७ रुपये, शासकीय मान्यतेसाठी १० कोटी २३ लाख २८ हजार २३३ रुपये, बक्षीस व योजनांसाठी १ कोटी ३१ लाख ७१ हजार ५१२ रुपये व विद्यार्थी कल्याण, सेवक कल्याण व सुरक्षा ठेवी म्हणून ८ कोटी ३३ लाख ७ हजार ४७७ रुपये अशा एकूण ६४ कोटी ९६ लाख ५७ हजार ८७९ रुपयांच्या ठेवींच्या माध्यमातून संस्थेने आर्थिक तरतूद केली आहे.
साडेसहाशे कोटींचे अंदाजपत्रक
संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी २०१८-१९ वर्षासाठी ६४९ कोटी ४० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ही रक्कम गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ४२ कोटींनी अधिक असून, या माध्यमातून संस्थेच्या भावी योजनांचे नियोजन होणार आहे. तसेच सुमारे ५० कोटी रुपयांचे कर्जही घेण्याची गरज पडण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. संस्थेने २०१०-११ पासून मार्च २००८ पर्यंत शाखा इमारत बांधकामावर एकूण १९२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तर गत वर्षात संस्थेने सुमारे ११ एकर १५ गुंठे जमीन खरेदी केली असून, संस्थेच्या मालकीची ८८५ एकर ८ गुंठे जमीन झाली आहे. याव्यतिरिक्त आॅगस्ट २०१८ पर्यंत साठेखत झालेल्या व परवानगीसाठी प्रलंबित असलेली १२३ एकर ८ गुंठे जमीनही संस्थेने खरेदी केली असून संस्थेकडे आतापर्यंत एकूण सर्व मिळून १००८ एकर १९ गुंठे जमीन असल्याची माहिती नीलिमा पवार यांनी दिली.

Web Title: Attention to Super Specialty, Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.