पंचक्रोशीतील मानाच्या यात्रोत्सवाकडे लक्षं
By admin | Published: December 16, 2015 11:30 PM2015-12-16T23:30:38+5:302015-12-16T23:41:23+5:30
ओझर : चांदीच्या मुकुटाच्या पालखीसह मानाच्या घोड्याची निघणार मिरवणूक
ओझर : श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेमागील पौराणिक दृष्टिकोन मार्गशीष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी या सहा दिवसांत शंकराने मार्तण्डभैरव अवतारात मैशासूर व मल्लासूर राक्षसांनी युद्ध केले होते. यात मल्लासुराचा वध झाला व मणिसूरनने शरणागती पत्करली. तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चपाषष्ठीचा होता, यालाच स्कधंषष्ठी, देवदिवाळी असेही म्हणतात. ओझर येथे भरणाऱ्या यात्रेला पंचक्रोशीतील विशेष महत्त्व आहे. चंपाषष्ठीला सर्वांत आधी ओझरची यात्रा त्यानंतर पंचक्रोशीतील सर्व यात्रा होतात.
राष्ट्रीय महामार्गालगत बाणगंगा पुलाजवळील जीर्णाेद्धार केलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या या यात्रेची सुरुवात बारागाडे ओढून होते. यात बारागाड्यांमध्ये देवाचा गाडा प्रथम असतो.
यानंतर वरचा माळीवाडा, मधला माळीवाडा, शेजवळवाडी, सोनेवाडी, भडकेवस्ती, पगार-गवळीवाडा, चौधरी- शिंदे वस्ती, कदम-पाटील आदि गाड्यांचा समावेश असतो.
या सर्व गावातून सवाद्य मिरवणुकीने यात्रेच्या ठिकाणी आणल्या जातात. यानंतर बारागाडे ओढल्या जातात. यात्रोत्सवात पहिल्या दिवशी विश्वस्तांच्या घरातील कुटुंबप्रमुख घटस्थापना करतात. त्यानंतर षष्ठीपर्यंत श्री मल्हार महात्म्याचे पारायण होते.
प्रत्येक दिवशी चढत्या क्रमाने मूर्तीवर पुष्पमाला चढविण्यात येतात.
चंपाषष्ठीच्या दिवशी मान्यवरांकडून महापूजा करण्यात येते. महापूजेनंतर श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. बाणगंगा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर पुरातन खंडेराव येथे प्रथमत विधिवत पूजा
होते.
बारागाड्या ओढण्यापूर्वी श्री खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाच्या पालखीची व मानाच्या घोड्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते.
नदीपात्रात पाण्यात मानाच्या अश्वाचे पाय धुवून पूजा केली जाते. त्यानंतर अश्वाला बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी आणण्यात येते. बारागाड्यातील रथ यात्रेचे मुख्य आकर्षण असून सुबक कलाकृती, जुन्या पिढीतील सुतारकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हा रथ असतो. (वार्ताहर)