त्र्यंबकेश्वर मंदिरावर आकर्षक रोषणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:52 AM2020-02-21T01:52:35+5:302020-02-21T01:53:03+5:30
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना गर्भगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्रीनिमित्तत्र्यंबकेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना गर्भगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
एकाचवेळी अनेक भाविक आत घुसले तर गर्भगृहाचा दरवाजा बंद होऊन अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी भाविकांना सकाळपासून तर मंदिर बंद होईपर्यंत गर्भगृह बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केले आहे. याबरोबरच महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी भक्ती संध्या हा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर शुक्रवारी भरत नाट्यम नृत्याचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी सुप्रसिद्ध गायक रामेश्वर डांगे भक्ती संगीत व अभंग गायन सादर करणार आहेत. शनिवारी कथक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
पालखी मिरवणूक
शुक्र वारी पारंपरिक पद्धतीने महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात येणार आहे. पालखी मेनरोडमार्गे लक्ष्मीनारायण चौक, पाचआळीतून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या दारासमोरून जाईल. तेथे पालखीचे औक्षण स्वीकारून कुशावर्ताच्या मागील बाजूने नेण्यात येईल. कुशावर्तावर स्नानपूजा, आरती होऊन नेहमीच्या परतीच्या पारंपरिक मार्गाने पालखी पुन्हा मंदिरात आणली जाईल. भाविकांनी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सामील होऊन पालखीची शोभा वाढवावी, असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.