फटाक्यांच्या ४९ गाळ्यांचे लिलाव रद्द
By admin | Published: October 18, 2014 12:31 AM2014-10-18T00:31:42+5:302014-10-18T00:33:18+5:30
पोलिसांचा नकार : तीन विभागांत ३१ ठिकाणी विरोध
नाशिक : महापालिकेने फटाके विक्रीच्या गाळ्यांसाठी १६० गाळ्यांचे लिलाव जाहीर केले होते; परंतु गुरुवारी १८, तर शुक्रवारी ३१ अशा प्रकारे ४९ गाळ्यांच्या जागांना पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे लिलाव रद्द करण्यात आले आहेत. त्याचा पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी ज्या जागांवर गाळे होते तेथेही पोलिसांनी नकार दिला आहे.
दिवाळीसाठी अधिकृत म्हणून १६० गाळ्यांचे लिलाव पालिकेने जाहीर केले होते. त्यापैकी नाशिक, पूर्व आणि पश्चिमसाठी गुरुवारी लिलाव झाले; परंतु त्यातील १८ गाळ्यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ते रद्द करण्यात आले. शुक्रवारी सातपूर, सिडको आणि नाशिकरोड विभागातील गाळ्यांचे लिलाव घोषित करण्यात आले होते; परंतु नाशिकरोडच्या बिटको चौकातील २२, जेलरोड पोलीस चौकीजवळील आणि सातपूर विभागातील शिवाजीनगर येथील एक असे ३१ गाळ्यांचे लिलाव पोलिसांनी हरकत घेतल्याने रद्द करण्यात आले. त्यामुळे उर्वरित गाळ्यांचे लिलाव करण्यात आले. एकूण १६० पैकी ४९ गाळ्यांचे लिलाव रद्द झाल्याने पालिकेला दहा दिवसांसाठी मिळणाऱ्या काही लाख रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागणार आहे.
वास्तविक पालिकेने गाळ्यांसाठी जागानिश्चिती करताना पोलिसांच्या बरोबरीने अथवा पूर्वपरवानगी घेतली असती आणि त्यांनतर लिलाव काढले असते तर ते रद्द करण्याची वेळ आली नसती. आता ऐनवेळी नवीन ठिकाणी गाळे उभारणीसाठी जागा निश्चित करून परवानगी घेणे जिकिरीचे जाणार असून, व्यावसायिकही त्यासाठी कितपत तयार होतील याविषयी शंकाच आहे. (प्रतिनिधी)