कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद
By प्रसाद गो.जोशी | Published: December 8, 2023 02:34 PM2023-12-08T14:34:45+5:302023-12-08T14:35:06+5:30
देशात कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपये आहेत. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते.
नाशिक - पिंपळगाव बसवंत (गणेश शेवटी) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्बंध लागू केल्याचे परिपत्रक काढल्यानंतर शेतकरी संतप्त झाले. शुक्रवारी (दि. ८) पिंपळगाव बसवंत बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
देशात कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपये आहेत. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते. हा निर्णय ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यातमूल्य दर ८०० डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबरपर्यंत एमईपी ८०० डॉलर प्रतिटन ठेवण्यात आले होते. मात्र, ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार आहे. दरम्यान, निर्यातबंदीचा निर्णय सरकारने मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी बाजार समितीला दिले