लासलगावी व्यापाऱ्यांकडून लिलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:44+5:302021-06-04T04:12:44+5:30
नाफेडच्यावतीने विंचूर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेला कांदा खरेदीसाठी एजन्सी मिळाली आहे. त्यानुसार बुधवार (दि. २) ...
नाफेडच्यावतीने विंचूर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेला कांदा खरेदीसाठी एजन्सी मिळाली आहे. त्यानुसार बुधवार (दि. २) पासून संस्थेने विंचूर येथे कांदा खरेदीला सुरुवातही केली. तसेच गुरुवारी (दि. ३) या संस्थेने लासलगाव येथूनही कांदा खरेदीसाठी लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाफेडकरिता कांदा खरेदीची बोली लावली गेली असता व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनासह व्यापाऱ्यांवर तोंडसुख घेतले. दरम्यान, बाजार समिती प्रशासन व व्यापारी यांची संयुक्त बैठक होऊन संबंधित एजन्सीच्या अधिकृत कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच लिलावात सहभागी होऊ देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लिलाव पूर्ववत सुरू झाले. संबंधित एजन्सी ही कांदा व्यापारी संघटनेची सभासद नसल्यानेच त्यांना लिलावात सहभागाची मनाई करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, नाफेडच्या खरेदीमुळे कांदा भाव वाढतील, या भीतीने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांसह संबंधित एजन्सीने केला आहे.
इन्फो
देवळ्याचे मार्केट अमावास्येला सुरू राहणार
देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विकलेल्या कांद्याचे पैसे चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांना रोखीने न देणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय संचालक मंडळ व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, अमावास्येच्या दिवशी लिलाव बंद ठेवण्याची अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा यापुढे बंद करून नियमितपणे लिलाव सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला.
इन्फो
गर्दीवर नियंत्रणासाठी....
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविण्याकरिता उमराणे येथील निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीने पुकारा करणाऱ्या कर्मचाऱ्याजवळ मायक्रो फोन स्पिकर दिला आहे. या स्पिकरमुळे संपूर्ण बाजार समितीच्या आवारात प्रत्येक वाहनधारक व कांदा विक्रेता शेतकऱ्यास आपल्या वाहनाजवळ बसून बाजारभाव ऐकता येत आहेत. त्यामुळे आवारात होणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात बाजार समितीला यश आले आहे.