बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:37 PM2020-02-26T23:37:47+5:302020-02-26T23:41:14+5:30
लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प
झाले.
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. १८ समस्यांचे निवेदन शासनाला दिले आहे.
कामगारांच्या समस्यांविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत संपाची भूमिका स्पष्ट केली आहे. माथाडींचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. माथाडी बोर्डावर पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वर्षानुवर्षे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काहीच होत नसल्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शशिकांत शिंदे यांनीही प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या अस्तित्वाला धक्का लागणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. कामगारांच्या हितासाठी आंदोलन करावे लागले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. एकट्या लासलगाव बाजार समितीत दिवसाला कांद्याची सुमारे २२ हजार क्विंटल आवक होते, तर पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कळवण विविध बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन एकूण दोन लाख हजार क्विंटल कांदा आवक होते. ते सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शासनाकडे आणि संबंधितांकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व बाजार समित्या बंद होत्या.माथाडी संघटनेने १८ प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनाला दिले आहे. हे सर्व प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत. प्रश्न न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. संपकरी माथाडी कामगार संघटनेच्या बोर्डातील एएसटीआय कंपनीच्या संगणक प्रणालीद्वारे देण्यात येणारी सेवा खंडित केल्याविषयी निर्णय व्हावा, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, समितीवर युनियनच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणे, विविध माथाडी बोर्डांची पुनर्रचना करणे व युनियनच्या सदस्यसंख्येच्या प्रमाणात सदस्यांची नेमणूक करणे, माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, मंडळामध्ये अध्यक्ष व सचिवांच्या नेमणुका करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. माथाडी पतसंस्थांमधून कर्जाचे हप्ते कपात न करण्याच्या निर्णय रद्द होणे, कळंबोली स्टील मार्केटमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे, फॅक्टरीमध्ये माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी करणे, विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करणे, माथाडी हॉस्पिटलच्या चौकशीचे गुºहाळ थांबवून रुग्णालय सुरळीत सुरू करण्यास सहकार्य करावे, कोल्हापूर माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात निर्णय घेणे, पुणे येथील कामगारांचे प्रश्न सोडविणे, माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतूद करणे, गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समिती गठीत करणे, नाशिक येथील माथाडी बोर्डातील कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, बाजार समितीच्या मापाडी व तोलणार कर्मचाºयांना बाजार समितीच्या सेवेत सामावून घेणे, वडाळा येथील माथाडी कामगारांच्या घरकुलातील अडचणी दूर करणे आदी मागण्या आहेत.