कांदा गोणीत आला तरच लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:37 PM2020-03-26T23:37:40+5:302020-03-26T23:38:14+5:30
मजूर उपलब्ध नसल्याचे कारण देत लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. याच कारणासाठी गुरुवारी (दि.२६) दुपारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तहसीलदार दीपक पाटील ,सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, सभापती सुवर्णा जगताप आणि व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली.
लासलगाव : मजूर उपलब्ध नसल्याचे कारण देत लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. याच कारणासाठी गुरुवारी (दि.२६) दुपारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तहसीलदार दीपक पाटील ,सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, सभापती सुवर्णा जगताप आणि व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली. दीड तास चाललेल्या या बैठकीत कांदा पिशवीमध्ये आणला तरच कांदा लिलाव सुरू करण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम राहिले. अखेर कांदा गोणीत आला तरच लिलावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, कांदा गोणी लिलावाचा प्रयत्न यापूर्वी झालेला होता, परंतु बारदान गोणीचा खर्च परवडण्याजोगा नसल्याने शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे आता ऐन वेळेस जाहीर केल्याप्रमाणे कांदा उत्पादक या आव्हानाला तयारी अभावी प्रतिसाद कमी देण्याची भीती आहे. दरम्यान, बैठकीत पणन मंडळाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सुरळीत रहाणे आवश्यक असल्याचे तहसीलदार दिपक पाटील यांनी सांगितले. तर व्यापारी प्रतिनिधीने मजूर टंचाईचे कारण देत लिलाव कांदा गोणी मध्ये व्हावे अशी मागणी केली. परंतु कोरोनामुळे कोणत्याच व्यापाºयाकडे कांदा गोणीचा साठा नसल्याने आता व्यापाऱ्यांनी ४० किलोचा कांदा गोणीत विक्रीस आणावा असा अट्टाहास धरला. यावेळी डी. के. जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते.
जनता कर्फ्यूनंतर कांदा गोणी शिवणेदेखील बंद आहे. त्यामुळे कांदा पिशवी शिवण्याचे काम ठप्प झाले आहे. या परिस्थितीची माहिती असतानादेखील बैठकीत कांदा लिलाव सुरू करण्याबाबत टोलवाटोलवीची भूमिका दिसून आली.