जप्त वाहनांचा ३० जानेवारीला लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:30 PM2018-01-21T22:30:50+5:302018-01-22T00:20:24+5:30
उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कर न भरल्याने जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक, बस, महिंद्र मॅक्स यांचा ३० जानेवारी रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
मालेगाव : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कर न भरल्याने जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक, बस, महिंद्र मॅक्स यांचा ३० जानेवारी रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. मोटार वाहन कर कायद्यानुसार प्रत्येक वाहनाचा नियमित कर भरणे ही प्रत्येक वाहनमालकाची जबाबदारी आहे. तथापि, वाहनमालक कर न भरता वाहनाचा वापर करीत असतात. असे वाहन रस्त्यावर आढळून आल्यास वायुवेग पथकाद्वारे पोलीस स्टेशन अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकवून ठेवण्यात येते. अशी अनेक वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात, एस.टी. डेपो व पोलीस स्टेशन येथे अटकवून ठेवण्यात आलेली आहेत. वाहनमालकांना कार्यालयाद्वारे कर भरणा करण्यासाठी नोटिसा पाठवूनही अनेक वाहनमालक कराचा भरणा करीत नाहीत. अशा वाहनांचा जाहीर लिलाव करून शासकीय कराची वसुली करण्यात येते. वाहनांचा लिलाव ३० जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव मार्केट यार्ड, कॅम्परोड, मालेगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ही सर्व वाहने जेथे आहेत तेथे व आहे त्या स्थितीत वाहनांची नोंदणी रद्द करून स्क्रॅप म्हणून लिलावाद्वारे विकण्यात येणार आहेत. या वाहनांचा रस्त्यावर वापर करता येणार नाही. लिलाव मंजूर झाल्यास वाहनाची संपूर्ण रक्कम त्याच दिवशी कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे.