मयुर महाले, भारती आहेर यांना रायला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 04:00 PM2019-02-04T16:00:22+5:302019-02-04T16:05:09+5:30
शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो, या आत्मविश्वासासह सकारात्मक विचार करून यशस्वीतेचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी रायला महोत्सवातून निरोप घेतला.
नाशिक : शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो, या आत्मविश्वासासह सकारात्मक विचार करून यशस्वीतेचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी रायला महोत्सवातून निरोप घेतला. बुद्धीप्रेरक खेळ, ध्यानयोग, क्रीडा मार्गदर्शन, झुम्बा, कृषी प्रक्षेत्र भेट, प्रेरणादायी व्याख्याने, अंतराळ सफर, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी रविवारी (दि.३) रायला महोत्सवाचा समारोप झाला. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, रायला महोत्सवाचे चेअरमन संतोष साबळे, सचिव मुग्धा लेले आणि हेमराज राजपूत उपस्थित होते. यावेळी सर्वोत्कृष्ट रायला अवॉर्ड सुनील चांडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यात मुलांमध्ये मयूर महाले तर मुलींमध्ये भारती आहेर यांना रायला अवॉर्ड देण्यात आला. तीन दिवसांच्या या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी कै. शामलाताई बिडकर आश्रमशाळा वाटे (दिंडोरी), माध्यमिक आश्रमशाळा धांडीपाडा (बागलाण), गिरीजादीदी माध्यमिक आश्रमशाळा शिंदे (सुरगाणा), पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक आश्रमशाळा कुकुडणे, रचना ट्रस्ट संचालित आश्रमशाळा धोंडेगाव (नाशिक), एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा उंबरठाम (सुरगाणा), माध्यमिक आश्रमशाळा सुळे (कळवण), माध्यमिक आश्रमशाळा आंबेगन (दिंडोरी) विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा अशा एकूण ९ आश्रमशाळांतील १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.