विकासकामांचे होणार दरमहा ‘आॅडिट’
By admin | Published: September 2, 2016 01:14 AM2016-09-02T01:14:52+5:302016-09-02T01:15:41+5:30
आयुक्तांच्या सूचना : प्रगती अहवालानुसार कार्यवाही
नाशिक : महापालिकेतील विविध खात्यांमार्फत होणाऱ्या विकासकामांसह प्रशासकीय कामकाजाचेही दरमहा आॅडिट करण्याचा निर्णय आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक खातेप्रमुखाने दरमहा आपल्याकडील कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करायचा असून, त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. यामुळे कामकाजात सुसूत्रता आणण्याचा आयुक्तांचा प्रयत्न आहे.
महापालिकेत विविध खात्यांमार्फत कामकाज चालते. परंतु, खात्यांमार्फत कोणत्या कामांची काय प्रगती आहे, कोणती कामे मुदतीत पूर्ण होऊ शकलेली नाही याची एकत्रित माहिती प्राप्त होत नव्हती. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सर्व खातेप्रमुखांना त्यांच्याकडील कामांसंदर्भात मासिक प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
खातेप्रमुखांना वेगवेगळ्या २२ प्रकारांमध्ये प्रगती अहवाल भरून द्यावा लागणार आहे. त्यात प्रामुख्याने एखाद्या विकासकामाला मंजुरी कधी मिळाली, निविदाप्रक्रिया कधी राबविली इथपासून ते मुदतीत काम पूर्ण होते आहे किंवा नाही याबाबतची माहिती नमूद करावी लागणार आहे. तसेच महापालिकेमार्फत होणाऱ्या करवसुलीचाही आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय, लोकायुक्तांकडे असलेली प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित असलेले दावे, लोकशाहीदिनी प्राप्त तक्रारींचा निपटारा, विविध प्रश्नी प्राप्त होणाऱ्या तक्रारी यांचीही माहिती देत त्याबाबतची प्रत्यक्ष स्थिती नमूद करावी लागणार आहे.
या मासिक प्रगती अहवालामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. (प्रतिनिधी)