मनपाच्या बससेवेसाठी आॅगस्टचाही मुहूर्त हुकला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 12:57 AM2020-08-24T00:57:55+5:302020-08-24T00:59:30+5:30
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा आॅगस्ट महिन्यात कधीही सुरू होऊ शकेल असे सांगितले गेले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच शासनाने प्रवासी वाहतूक म्हणून शहरात अनेक अद्याप परवानगी न दिल्याने मुहूर्त हुकला आहे. दरम्यान, सातशे वाहक आणि अन्य तांत्रिक कामे बाकी असल्याने हे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा आॅगस्ट महिन्यात कधीही सुरू होऊ शकेल असे सांगितले गेले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच शासनाने प्रवासी वाहतूक म्हणून शहरात अनेक अद्याप परवानगी न दिल्याने मुहूर्त हुकला आहे. दरम्यान, सातशे वाहक आणि अन्य तांत्रिक कामे बाकी असल्याने हे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर तब्बल सहा वेळा बस सेवेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. मात्र, राज्यातील आणि महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने ही सेवा महापालिकेच्या गळ्यात मारली आहे.
पारंपरीक मॉडेल पेक्षा वेगळे मॉडेल म्हणून बस सेवेसाठी ठेकदाराच्या बस प्रति किलो मीटर भाड्याने चालविण्यास देण्याचे ठरविण्यात आले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे मॉडेल तयार केले. परंतु नंतर त्यांची बदली झाली.
दरम्यान, पर्यावरण स्रेही म्हणून डिझेलच्या अवघ्या पन्नास मिडी बस तर पन्नास इलेक्ट्रीकल आणि दीडशे सीएनजी अशा साडे तीनशे बसच्या माध्यमातून बस सेवा सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी निविदा देखील मंजुर झाल्या असून ठेकदाराने फेबु्रवारी महिन्यात आणून ठेवल्या आहेत. त्या तेथेच पडून आहे.
आता वाहकांच्या ठेक्यावर नजर
महापालिकेत सातशे सफाई कामगारांची आॅऊटसोर्सिंंगने नियुक्ती तसेच पेस्ट कंट्रोलला मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका गाजल्यानंतर आता वाहक भरतीवर काही ठेकेदार आणि राजकिय नेत्यांची नजर आहे. ठेकेदारीत भागीदारी करण्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. त्यामुळे हा ठेका गाजण्याची शक्यता आहे.
४प्रशासनाने ठरविलेतर आॅगस्ट महिन्यात ही सेवा सुरू करण्याची तयारी केवळ कागदावरच राहीली आहे. सध्या शासनाने मिशन बिगेन सुरू केले असले तरी शहरातील बस आणि रिक्षा बंदच आहे. त्याचा परिणाम देखील जाणवत आहे. महापालिकेने बस सेवा सुरू केलीच तर ती ततत्काळ पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाही तर केवळ काही रूटवर ही सेवा देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या तरी लॉकडाऊनमुळे महापालिकेचा प्रस्ताव रखडलेलाच आहे.
महापालिकेच्या वतीने आडगाव
तसेच तपोवन येथे बस स्थानकाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यात फार प्रगती नाही. नाशिकरोड येथील सिन्नर फाटा तसेच आनंद नगर येथील स्थानक महापालिकेला मिळाल्यागत जमा आहे. तथापि, तेथेही अंतिम कामे झालेली नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे इंटीग्रेटेड ट्रॅफीक मॅनेजेमेंट सिस्टीम्स आणि सातशे वाहन
चालक भरण्याच्या ठेक्याचा अद्याप फैसला झालेला नाही.