औरंगाबादच्या यांत्रिक झाडूची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:09 AM2017-07-27T01:09:19+5:302017-07-27T01:09:35+5:30
नाशिक : औरंगाबाद येथे महापालिकेच्या वतीने स्विपिंग मशीन म्हणजेच यांत्रिक झाडूचा वापर करून स्वच्छता केली जात असून, महापौर रंजना भानसी व गटनेत्यांनी प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : औरंगाबाद येथे महापालिकेच्या वतीने स्विपिंग मशीन म्हणजेच यांत्रिक झाडूचा वापर करून स्वच्छता केली जात असून, त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी व गटनेत्यांनी प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. नाशिक शहराच्या सहा विभागांत सहा ठिकाणी अशाप्रकारच्या मशीन्स खरेदी करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला. नाशिक शहरातील स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर महापौर तसेच गटनेत्यांनी बुधवारी औरंगाबाद येथे भेट दिली. औरंगाबाद महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छतेच्या कामांबरोबरच यांत्रिक झाडूची माहिती घेतली.औरंगाबाद महापालिकेने २०१३ मध्ये यांत्रिक झाडू वापराचा ठराव केला. २०१५ मध्ये या यंत्राची खरेदी करण्यात आल्यानंतर त्याचा स्वच्छता आणि धूळ हटविण्यासाठी वापर करण्यात आला. जालना रोड, जळगाव, व्हीआयपी रोड अशा शहरातील पंधरा मार्गांवर या यांत्रिक झाडूद्वारे रात्रीच्या वेळी स्वच्छता केली जाते. दहा मजुरांचे काम केवळ हे एक मशीन करते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरूस्कर, विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील, उद्धव निमसे, सलीम शेख आदी उपस्थित होते.