आॅस्ट्रेलियन कंपनीची नाशिकमध्ये गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:40 AM2019-12-09T00:40:54+5:302019-12-09T00:41:37+5:30
नाशिक भेटीवर आलेल्या आॅस्ट्रेलिया येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.
सातपूर : नाशिक भेटीवर आलेल्या आॅस्ट्रेलिया येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले.
आॅस्ट्रेलिया येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून गुंतवणुकीबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार अर्बन वॉटर फाउंटनचे व्यवस्थापकीय संचालक गॅरी अलन आणि संचालक सायमन हिंगीस नाशिक भेटीवर आले असता त्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीला भेट दिली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश पाटील, राम पाटील, राजेंद्र अहिरे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे कंपनीची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आयोजित कार्यक्र मात खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी यांनी या परदेशी गुंतवणूकदारांचे स्वागत करून भारत सरकारतर्फे सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान आॅस्ट्रेलियन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची भेट घेऊन नाशिकमध्ये पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे निरिक्षण नोंदविले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे, महावितरणचे मुख्य अभियंता ब्रीजलाल जनवीर आदी उपस्थित होते.
शुद्ध पाणी देणारे उत्पादन
आॅस्ट्रेलियन उत्पादनाचे नाशिकमध्येही उत्पादन करून हे शुद्ध पाणी देणारे उत्पादन सार्वजनिक सोसायट्यांमध्ये, उद्यानात, जॉगिंगपार्क , रेल्वे स्टेशन, बसस्टेशन, ग्रामीण व आदिवासी भागात बसविता येऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतील. तसेच हे पर्यावरणाला पूरक असे उत्पादन असल्याची माहिती दिली. बदलत्या वातावरणात शहरातील नागरिकांसाठी सदर उत्पादन उपयुक्त ठरणार असल्यामुळे भविष्यात या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होऊ शकते. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या या उत्पादनामुळे नवीन व्हेंडर बेस तयार होईल व नवीन रोजगारदेखील निर्माण होऊ शकतो, असाही विश्वास व्यक्त केला.