‘लेखक तुमच्या भेटीला’ आजपासून सुरूवात
By admin | Published: August 6, 2016 01:08 AM2016-08-06T01:08:41+5:302016-08-06T01:09:21+5:30
उपक्रम : प्रभा अत्रे, विकास आमटे, सुशीलकुमार शिंदे यांचाही सहभाग
नाशिक : ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचे शनिवार, दि. ६ आॅगस्ट ते रविवार दि. २५ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध लेखक तसेच साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या मुलाखत आणि बंदिशीच्या सादरीकरणाने होणार आहे. या उपक्रमांतर्गत डॉ. विकास आमटे, माजी केंद्रीय ऊर्जा आणि गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात शनिवारी (दि. ६) ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची मुलाखत तसेच बंदिशीचे सादरीकरण, बुधवारी (दि. १७) साहित्यिक तथा पत्रकार प्रा. विलास पाटील ‘अध्यात्माचा पंचनामा’ या विषयावर संवाद साधणार आहेत.
शनिवारी (दि. २७) डॉ. रोहित साने हे ‘हृदयस्पर्शी संवाद’ या विषयावर आपली मते मांडणार आहेत. रविवारी (दि. २८) आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉ. श्रीकांत परांजपे ‘आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि त्याचे भारतावरील परिणाम’ या विषयावर संवाद साधणार आहेत. सप्टेंबर महिन्यात शनिवारी (दि. ३) ‘ओळख सियाचीनची’ या विषयावर अनुराधा गोरे ह्या लघुपटातून सियाचीनची माहिती उलगडून सांगणार आहेत. रविवारी (दि. ४) आनंदवनचे संचालक डॉ. विकास आमटे मुलाखत आणि चित्रफितीतून आनंदवनचा इतिहास उलगडून सांगणार आहेत. रविवारी (दि. ११) ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आरती दातार ‘गदिमा तो राजहंस एक’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. शनिवारी (दि. १७) डॉ. तारा भवाळकर ‘सीतायण काल आणि आज’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाची सांगता रविवारी (दि.२५) माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘मला भेटलेले साहित्यिक आणि त्यांचे साहित्य’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. या उपक्रमांतर्गत होणारे सगळे कार्यक्रम गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यास कूर्तकोटी सभागृहात संध्याकाळी ६.३० वाजता होणार असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.