वाहन व्यवस्थित, जीवन सुरक्षित : वर्षा सहलीच्या प्रवासात अशी घ्या दक्षता
By vijay.more | Published: July 30, 2018 02:38 PM2018-07-30T14:38:20+5:302018-07-30T14:48:02+5:30
आंबेनळी घाटात पर्यटकांची बस दरीत कोसळल्याच्या दुर्घटनेत ३३ पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने अवघा देश हादरला होता. पावसाळ्यात वाहन चालविताना काय खबरदारी घेतली तर संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येतील, याबाबत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) एक नियमावली जाहीर केली आहे.
विजय मोरे , नाशिक
हिरवाईने सजलेली सृष्टी...डोंगरमाथ्यांवरुन होणाऱ्या पांढ-या शुभ्र जलधारांचा वर्षाव... थंड वारा अन् बरसणा-या पाऊसधारा अशा वातावरणामुळे सर्वच सृष्टीला निसर्गाकडून आगळीवेगळी जणू सजावट केलेली आहे, की काय असा भास होतो. पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर, अंबोली, कर्जत, लोणावळा, खंडाळा, माळशेज, भंडारदरा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर अशा पावसाळी डेस्टिेनेशला भेट देत वर्षा सहलीचा आनंद लुटण्याचा मोह होणे स्वभाविक आहे; मात्र सहलीचा आनंद लुटता यावा, यासाठी सुरक्षित प्रवासदेखील गरजेचा आहे. गेल्या रविवारी आंबेनळी घाटात पर्यटकांची बस दरीत कोसळल्याच्या दुर्घटनेत ३३ पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने अवघा देश हादरला होता. पावसाळ्यात वाहन चालविताना काय खबरदारी घेतली तर संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येतील, याबाबत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) एक नियमावली जाहीर केली आहे. हे नियम वाहतूकीबाबत सतर्कता दर्शविणारे आहेत. या नियमांचे पालन जर पर्यटकांनी केले तर नक्कीच वर्षा सहलीदरम्यान होणा-या अपघाताच्या घटना टाळता येऊ शकतात.
* अती पर्जन्यवृष्टी होत असलेल्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावेच.
* खराब हवामानात रस्त्यांवर चिन्हांद्वारे दर्शविण्यात आलेली वेगमर्यादा ही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेत कमाल मर्यादेपेक्षाही कमी वेग ठेवावा.
* पहिल्या पावसात रस्त्यावर सांडलेले गाडीचे तेल, डिझेल, ग्रीस व इतर स्निग्ध पदार्थामुळे रस्ता निसरडा होण्याची शक्यता असते. यामुळे वाहनांच्या चाकांची रस्त्याबरोबर आवश्यक असणारी पकड कमी होते. त्यामुळे वाहन घसरण्याची बळावते.
* कोरड्या रस्त्यापेक्षा, ओल्या रस्त्यावर वाहनाचे ब्रेक उशीरा लागतात. त्याचबरोबर पावसाळ्यात रस्त्यावर साचणाºया पाण्यामधून वाहन जेव्हा जोरात जाते, तेव्हा वाहनाच्या चाकांचा रस्त्याबरोबर असणारा संपर्क तुटतो व वाहन पाण्यावर अंशत: तरंगते़ अशा परिस्थितीत वाहने रस्ता सोडण्याचा धोका संभवतो, या स्थितीला हैड्रोप्लेनिंग म्हणतात. यामुळे वाहनचालकाने खराब हवामानात वाहनचा वेग हा रस्त्यावर प्रदर्शित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा कमी ठेवावा.
* खराब हवामानात दोन वाहनांमध्ये पुरेसे अंतर ठेवा. यामुळे इतर वाहनचालकांना त्यांचे वाहन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे अंतर मिळेल. खराब हवामानात जी अडचण आपल्याला भेडसावते, त्याच अडचणी आपल्या पुढील अथवा मागील वाहनचालकांनाही भेडसावत असतात, याची जाणीव ठेवा. एकमेकांना सहकार्य करा.
*रस्त्यावरून अथवा नदी-नाले, ओहोळ यांच्या पुलांवरुन जर पाणी वाहत असेल तर त्यामधून वाहने पुढे दामटविण्याचा धोका पत्कारु नका़
* सहलीला जाण्यापुर्वी आपल्या वाहनाचे हेडलाइट, इंडिकेटर, टेल लॅम्प सुस्थितीत असल्याची खात्री करा. वाहनाची पुर्व तपासणी करुन घ्या. पावसाळ्यात धुक्यामुळे तसेच सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे दूरपर्यंत दिसत नाही. या कारणास्तव जसे आपणास दिसत नाही तसेच इतर वाहनचालकांनादेखील दिसत नाही याचे भान बाळगा.
* पावसाळ्यात रात्रीचे वाहन चालवित असाल तर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर व बदलत्या वातावरणाकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा.
* पावसाळ्यात वाºयाचा वेग अधिक असतो. घाटमार्गावर तो अधिकच जाणवतो, अशा वेळी वाहनाच्या स्टिअरिंगवर पकड घट ठेवा़ जेणेकरून आपले वाहन रस्ता सोडणार नाही. वारे खूपच जोरात असेल तर वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवा व वारे कमी झाल्यानंतर प्रवास सुरु करा. एकूणच हवामान केंद्राशी संपर्क साधून काही थंड हवेची ठिकाणे व अतिपर्जन्यवृष्टीच्या ठिकाणांचा हवामान अंदाज जाणून घ्या. वाºयाचा प्रतीतास वेग माहित करुन घ्या.
* वाहनाचे दिवे चालू ठेवा व वाहन शक्यतितक्या डाव्या बाजूने चालवा . वाहन थांबवायचे असल्यास रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला वाहन थांबवू नका. पुलावर तर अजिबात वाहन थांबविण्याचा अट्टहास फोटेसेशनपुरताही करणे टाळा.
सुरक्षित जागा बघून आपले वाहन थांबवा. वाहन थांबविल्यावर वाहनाचे इंजिन, दिवे बंद करावेत. वाहनाच्या ब्रेकवर पाय ठेऊ नका अन्यथा ब्रेक लाईट चालु राहतील व मागुन येणा-या वाहन चालकास आपले वाहन चालु आहे असे वाटेल व अपघात होण्याची शक्यता आहे. अशा वेळी साईड इंडिकेटर (पार्किंग मोड) सुरू ठेवा़
* वाहन सुस्थितीत ठेवा, वाहनाचे पुढील, मागिल दिवे व साईड ईन्डिकेटर चालू असल्याची खात्री करा.
* चाकांमध्ये हवेचा योग्य दाब असल्याची खात्री करा. खराब अथवा झिजलेले टायर बदलुन मग पुढील प्रवास सुरू करा. टायर चांगले असले की वाहन रस्ता धरून चालते व घसरत नाही. रस्त्यावरील वाहनाची पकड टिकवून राहण्यास अधिक मदत होते.
* वाहनांचे ब्रेक सुस्थितीत असल्याची खात्री करा. वायफरचे ब्लेड पावसाळ्यापुर्वी बदला़ तसेच वाहनाची काच स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे द्रव्य नियमीत पुर्णपणे भरले आहे का? याची खात्री करा.
* प्रवासात आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणा-या वस्तुंचा संच सोबत ठेवा. पावसाळ्यात रस्त्यावर अडथळे येणे हे नित्याचे असते. त्यामुळे प्रवासात दिरंगाई होऊ शकते, यासाठी सोबत पुरेसे खाद्यपदार्थ व पाणी ठेवा़ विलंब होऊ लागल्यावर वाहने दामटविण्याचा प्रयत्न करु नका. मर्यादित वेगापेक्षाही कमी वेग वाहनाचा ठेवा. रस्त्यांवरील ग्रामिण भागात अधिक खड्डे असतात.
*वाहनाचे टायर पंक्चर झाले अथवा वाहन नादुरूस्त झाल्यास भांबावून जाऊ नका, शांत राहा. वाहन रहदारीच्या रस्त्यावरून सुरक्षीत ठिकाणी बाजुला ऊभे करा आणि संयमाने मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करा. जवळचे पोलीस ठाणे, अथवा आपत्कालिन परिस्थितीशी संपर्क साधा.
*. पावसाळ्यात प्रवासाला सुरवात करण्यापुर्वी हवामानखात्याच्या सुचना तपासून घ्या. हवामान खात्याकडुन जारी करण्यात येणा-या विविध प्रकारच्या इशा-यांचा अर्थ समजुन घ्या व आवश्यक असेल तरच प्रवास करा.
* रेडिओ व टि.व्हीद्वारे देण्यात येणा-या हवामान अंदाज लक्षपूर्वक ऐका, त्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. वादळवारा पुर, पाऊस इत्यादीबाबत देण्यात येणारा दक्षतेचा व अतिदक्षतेचे इशारे यांचे अर्थ माहीती असणे महत्वाचे असते.
* जी अडचण आपणास असते तशीच अडचण इतर वाहन चालकांनाही (सहप्रवासी) असते. त्यामुळे एक जबाबदार वाहनचालक होऊन वाहन चालवा यामुळे इतर वाहनचालकांना त्रास होणार नाही. मद्यप्राशन करुन वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मद्याच्या नशेत वाहने चालवून जीव धोक्यात घालू नका.
* वाहनाच्या यांत्रिक स्थितीबाबत थोडी जरी शंका आल्यास ताबडतोब वाहन कंपनीच्या अधिकृत दुरूस्ती केंद्रात पाठवावे. वास्तविक कंपनीने विहीत केले प्रमाणे दर १०,००० किंवा १५,००० कि.मी प्रवास केल्यानंतर वाहनाचे सर्व्हिसिंग करून घेणे सुरक्षीतीतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
नियमांचे पालन केल्यास अपघातांना नक्कीच आळा
दापोली कृषी विद्यापिठातील कर्मचा-यांचा आंबेनळी घाटातील अपघातात मृत्यू झाला़ अशा दुर्घटना घडू नये यासाठी वाहनचालकांनी पावसाळ्यात वाहन चालविण्यासाठी साधारणपणे कोणती काळजी घ्यावी यासाठीचे हे सतरा नियम आहेत़ या नियमांचे पालन केल्यास अपघातांना नक्कीच आळा बसेल़
- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी,नाशिक