रिक्षाचालकाला विहिरीत ढकलून ठार मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:31 AM2019-06-08T00:31:00+5:302019-06-08T00:31:16+5:30
रिक्षावर झालेल्या कारवाईचा दंड भरण्याच्या कारणावरून वाद घालून धमकी देत रिक्षाचालकाला विहिरीत ढकलून जिवे ठार मारल्याप्रकरणी रिक्षामालकासह दोन जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : रिक्षावर झालेल्या कारवाईचा दंड भरण्याच्या कारणावरून वाद घालून धमकी देत रिक्षाचालकाला विहिरीत ढकलून जिवे ठार मारल्याप्रकरणी रिक्षामालकासह दोन जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विहितगाव मथुरारोड कोठुळे मळा येथे राहणारा रिक्षाचालक सुशील गायकवाड (१९) हा बुधवार (५ जून) सायंकाळी आगरटाकळी राहुलनगर येथील मोकळ्या जागेतील पडीक विहिरीत पडून मरण पावला होता. याप्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
याप्रकरणी मयत सुशीलचे वडील प्रवीण संपत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुशील याने हमीद रशीद शेख (१९) रा. समतानगर, आगरटाकळी याची रिक्षा रोजाने चालविण्यास घेतली होती. सुशील हा बिटको ते देवळाली कॅम्प या मार्गावर व्यवसाय करत होता. गेल्या ३० मे रोजी देवळाली कॅम्प झेंडा चौक येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी सुशीलची रिक्षा जप्त केली होती. त्यानंतर वडील प्रवीण हे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताकीद देऊन ३ जूनला न्यायालयात दंड भरण्याचे सांगितले होते. दरम्यान, ४ जूनपासून रिक्षामालक हमीद हा सुशीलला फोन करून तू लवकरात लवकर दंड भर नाहीतर रिक्षा तूच ठेवून घे असे वारंवार सांगत होता. गेल्या बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुशील हा घराजवळील उद्यानात उभा असताना रिक्षामालक हमीद व त्याचे दोन मित्र हे सुशीलला रिक्षा (एमएच १५ एफयू ३०४७) हिच्यामध्ये बसवून घेऊन गेले. त्यानंतर संध्याकाळी टाकळी शिवारातील पडिक विहिरीत सुशील मयत स्थितीत आढळून आला.