रिक्षा, टॅक्सीचालकांचा शनिवारचा बंद मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2016 11:47 PM2016-03-03T23:47:51+5:302016-03-03T23:48:49+5:30
रिक्षा, टॅक्सीचालकांचा शनिवारचा बंद मागे
पंचवटी : परिवहन विभागाने वाढविलेले शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील रिक्षा व टॅक्सीचालक- मालकांनी येत्या शनिवारपासून पुकारलेला संप दहावी परीक्षेमुळे मागे घेतला आहे, अशी माहिती श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध परवाने काढण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात भरमसाठ वाढ केल्याने ही दरवाढ रिक्षा, टॅक्सीचालकांना न परवडणारी आहे. सदरची दरवाढ शासनाने मागे घ्यावी, या मागणीसाठी श्रमिक सेनेसह सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने येत्या शनिवारपासून बेमुदत बंद पुकारण्यात आला होता. मात्र दहावीच्या परीक्षा असल्याने व अनेक विद्यार्थी रिक्षा तसेच टॅक्सीने प्रवास करीत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्वानुमते बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांनी दिलेल्या लेखी पत्राचा विचार करून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बिनशर्त बंद मागे घेतला आहे, असे सुनील बागुल यांनी शेवटी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवाजी भोर, बाळासाहेब पाठक, शशिकांत उन्हवणे, अजय बागुल, हैदर सय्यद, मामा राजवाडे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)