अवनखेड ग्रामपंचायत राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 01:56 AM2021-07-01T01:56:42+5:302021-07-01T01:57:01+5:30
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल शासनाकडून जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, गुरुवारी (दि. १) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदुष्यप्रणालीद्वारे ग्रामपंचायतीला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
नाशिक : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल शासनाकडून जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, गुरुवारी (दि. १) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदुष्यप्रणालीद्वारे ग्रामपंचायतीला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाच्यावतीने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. यामुळे गावांमध्ये स्वच्छतेसाठी स्पर्धा लागली. या अभियानाला स्वच्छ भारत अभियानाची जोड मिळाल्याने गाव हगणदारीमुक्त झाली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत घर, परिसर स्वच्छता, सजावट स्पर्धा, जागतिक हात धुवा दिन, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सफाई, स्वच्छ जनावरे, आदर्श गोठा, पाणी शुद्धता, सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधी चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन २०१७-२०१८ च्या पुरस्कारासाठी रात्यस्तरीय तपासणी समितीकडून अवनखेड ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात आली. यात शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन, घर, गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, लोकसहभाग आणि सामूहिक स्वयंपुढाकारातून नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात येऊन या निकषाच्या आधारे ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.
चौकट==
अन्य गावांनीही आदर्श घ्यावा
लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी सहभाग घेऊन ग्रामविकासाचा पाया मजबूत केला असून, जिल्ह्यातील अन्य गावांनी स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपले गाव आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करावेत.
- बाळासाहेब क्षीरसागर
------
ग्रामपंचायतींना कामाची संधी
पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन आणि लोकसहभाग या चतु:सुत्रीप्रमाणे गावाने एकजुटीने काम केल्यास आदर्श गावाकडे वाटचाल करण्याची क्षमता सर्व ग्रामपंचायतीकडे असून, यामध्ये उत्कृष्ट काम करण्याची संधी आहे.
- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी.
----------