अवनखेड पंचायतला ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार
By admin | Published: June 29, 2017 01:21 AM2017-06-29T01:21:32+5:302017-06-29T01:21:47+5:30
नाशिकरोड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हिवरे बाजार ग्रामपंचायतीस जाहीर झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०१६-२०१७चा विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा १० लाख रुपयांचा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीस, तर द्वितीय आठ लाखांचा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायत व तृतीय सहा लाखांचा पुरस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मलांजन ग्रामपंचायतीस जाहीर झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिली. राज्य शासनाकडून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर ग्राम पंचायतींना पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, घर-गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज संकल्पनानुसार उपलब्धी, लोकसहभाग आणि सामूहिक स्वयं पुढाकारातून नावीन्यपूर्ण उपक्रम या मुद्द्याच्या आधारे गुणांकन करून संत गाडगेबाबा स्वच्छ अभियानांतर्गत पुरस्कार दिले जातात. पुरस्कार निवडीसाठी विभागस्तरीय समितीमध्ये विभागीय आयुक्त महेश झगडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुदर्शन कालिके, सहायक अभियंता विष्णू वाघमोडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, विभागीय उपायुक्त एन. पी. मित्रगोत्री, सुकदेव बनकर, सहायक आयुक्त संदीप माळोदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत व माहिती घेऊन पुरस्कारार्थी ग्रामपंचायतीची निवड केली आहे.
पुरस्कारार्थी ग्रामपंचायत
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१६-१७ प्रथम पुरस्कार (१० लाख) - अहमदनगर जिल्हा हिवरे बाजार ग्रामपंचायत, द्वितीय (८ लाख) - दिंडोरी तालुका अवनखेड ग्रामपंचायत, तृतीय (६ लाख) - धुळे जिल्ह्णातील साक्री तालुका मलांजन ग्रामपंचायत यांना घोषित करण्यात आला आहे.
विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागातून तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पाणी गुणवत्ता- पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनबद्दल स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार (३० हजार)- माळेगाव ग्रामपंचायत, ता. सिन्नर, जि. नाशिक , सामाजिक एकता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (३० हजार)- पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायत, ता. शहादा, जि. नंदुरबार, कुटुंब कल्याण- स्व. बाबासाहेब खेडकर पुरस्कार (३० हजार)- लोणी ग्रामपंचायत, ता. राहता, जि. अहमदनगर यांना जाहीर करण्यात आला आहे. विशेष पुरस्कारप्राप्त तीन ग्रामपंचायतींपैकी प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीमार्फत तपासणी होऊन राज्य स्तरावरून अंतिम प्रथम तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार असल्याची माहिती झगडे यांनी दिली.