पूर्व भागात उदंड उत्साहात सरासरी ९० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:27+5:302021-01-16T04:18:27+5:30
एकलहरे : नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक शांततेत पार पडली. पूर्व भागातील एकलहरे परिसरातील चांदगिरी, कालवी, हिंगणवेढे, जाखोरी, शिलापूर, लाखलगाव-गंगापाडळी, ...
एकलहरे : नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक शांततेत पार पडली. पूर्व भागातील एकलहरे परिसरातील चांदगिरी, कालवी, हिंगणवेढे, जाखोरी, शिलापूर, लाखलगाव-गंगापाडळी, मोहगाव-बाभळेश्वर या सात ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची असली तरी शांततेत पार पडली. पूर्व भागातील मतदारांचा उत्साह बघता सरासरी ९० टक्के मतदान झाले.
नोकरदारांना सुटी दिल्याने व तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने यंदा अनेक ठिकाणी समझोता होऊन काही जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित जागांसाठी दोन पॅनेल समोरासमोर असल्याने चुरस निर्माण झाली होती. शेतीची कामे असल्याने अनेक मतदारांनी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावून गेले. दुपारी बारा-एकपर्यंत महिलांची गर्दी ठिकठिकाणी मोठी दिसत होती. पोलिसांनी व निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख नियोजन केल्याने निवडणूक शांततेत व उत्साहात पार पडली.
कालवी ग्रामपंचायतीत सात जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्याने तीन जागांसाठी दोन पॅनेलमधून सरळ लढत झाली. एकूण ६५० मतदार असून, ९५ टक्के मतदान झाले. हिंगणवेढेत सात जागांसाठी दोन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. १ हजार ११६ मतदारांपैकी १ हजार २१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९१.४८ टक्के मतदान झाले. शिलापुरात नऊ जागांसाठी दोन पॅनेलमध्ये अटीतटीची लढत होती. या ग्रामपंचायतीत १४०० मतदार संख्या असून, ९५ टक्के मतदान झाले.
मोहगाव बाभळेश्वर ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी निवडणूक झाली. १ हजार ७०४ पैकी १ हजार ५३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
चांदगिरीत सात जागांसाठी मतदान झाले. या ग्रामपंचायतीत ९९९ मतदारांपैकी ८९१ जणांनी मतदान केले. म्हणजे ८९.९८ टक्के मतदान झाले
जाखोरीत नऊ जागांसाठी दोन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक झाली. १ हजार ९८३ मतदारांपैकी १ हजार ७४९ मतदारांनी मतदान केल्याने एकूण ८८.२० टक्के मतदान झाले.
लाखलगाव गंगापाडळी ग्रुप ग्रामपंचायतीत बारा जागांसाठी मतदान झाले. ३ हजार ५३१ मतदारांपैकी ३ हजार ५३ मतदानाचा हक्क बजावला.