नाशिक शहरात प्रारंभीच्या दोन तासात सरासरी ७ टक्के मतदान
By धनंजय रिसोडकर | Published: May 20, 2024 12:09 PM2024-05-20T12:09:45+5:302024-05-20T12:09:56+5:30
सकाळी ९ पर्यंत नाशिक महानगरातील मतदान केंद्रांवर सरासरी ७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
नाशिक : शहरात सकाळी ७ वाजेपासूनच मतदारराजा बाहेर पडला असून नाशिक महानगरातील बहुतांश मतदान केंद्रांवर नागरिक मतदानासाठी येऊन रांगा लावून शिस्तबद्धपणे मतदान करीत होते. काही मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्याचेही दिसून येत होते. प्रारंभीच्या दोन तासात अर्थात सकाळी ९ पर्यंत नाशिक महानगरातील मतदान केंद्रांवर सरासरी ७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
सकाळच्या सत्रात मध्यमवयीन मतदार सहकुटुंब मतदान करीत असल्याचे अधिक प्रमाणात दिसून येत आहे. काही मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांच्या बुथवर नागरिक त्यांचे नाव शोधत असल्याने तर बुथवर मोबाईल नेण्यास परवानगी नसल्याने कुटुंबातील एक जण बाहेरच थांबून बाकीचे कुटुंबीय मतदान करीत असल्याचेही दिसून येत आहे . त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारा बाहेर देखील नागरिक घोळक्याने उभे असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश केंद्रांवर मतदान अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धपणे सुरु होते. काही मतदान केंद्रांच्या प्रवेशव्दारापासून मतदानाच्या बुथचे अंतर खूप लांब असल्याने दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना नेण्यासाठीदेखील व्हीलचेअरचा वापर केला जात असल्याचे दिसत होते. सकाळी ८ नंतर मतदारांची गर्दी वाढली असून पहिल्या दोन तासात प्रत्येक बुथवर सरासरी ७ टक्के नागरिकांचे मतदान झाले होते. शहरातील अपवादात्मक मतदान केंद्रांवर मशीनमध्ये बिघाडासारख्या घटना घडल्या. मात्र, तत्काळ त्यावर उपाय करण्यात आल्याने कुठेही गोंधळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार झाले नाही.
इन्फो
सकाळच्या ७ ते ९ पर्यंतच्या सत्रातील मतदानाची टक्केवारी
नाशिक पूर्व ६.४८ टक्के
नाशिक मध्य ७.१२ टक्के
नाशिक पश्चिम ६.२८ टक्के