बाधित रूग्ण सापडल्याने शिक्षण विभागाला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:30 PM2020-07-15T17:30:42+5:302020-07-15T17:36:01+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने बुधवारी सकाळीच शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात आले असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत नुतन प्रशासकीय इमारतीवर प्रवेश बंदी लादली आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने बुधवारी सकाळीच शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात आले असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत नुतन प्रशासकीय इमारतीवर प्रवेश बंदी लादली आहे.
जिल्हा परिषदेने आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या असून, शासकीय कामकाजानिमित्त येणा-या अभ्यागतांचीही तपासणी करून कार्यालयात सोडले जात आहे. असे असताना माध्यमिक शिक्षण विभागातील एक कर्मचारी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्रास होत असतानाही कार्यालयात कामकाज करीत होता. बुधवारी सकाळी त्याला अधिक त्रास होवू लागल्याने त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच दरम्यान त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने त्याची दखल घेत माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरंटाईन होण्याच्या सुचना देण्यात आल्या. गेल्या महिन्यात अशाच प्रकारे ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील एक कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने सदरचा विभाग पुर्ण बंद करण्यात आला होता व त्यानंतरच प्रशासनाने अभ्यागतांवर निर्बंध लादण्याबरोबरच खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत माध्यमिक शिक्षण विभागाबरोबरच, लघु पाटबंधारे, एकात्मीक बाल विकास प्रकल्प व ग्रामीण पाणी पुरवठा असे विभाग असून, या इमारतीत कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने सर्व विभागातील कर्मचारी धास्तावले आहेत.