नगरसेवकांच्या श्रेयवादावरून उद्यानाला टाळे
By Admin | Published: May 12, 2017 01:53 AM2017-05-12T01:53:36+5:302017-05-12T01:53:50+5:30
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २४ मध्ये काही महिन्यांपूर्वी नागरिकांसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान व क्रीडांगण खुले करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २४ मध्ये काही महिन्यांपूर्वी नागरिकांसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान व क्रीडांगण खुले करण्यात आले आहे. मात्र सुरक्षा रक्षक नसल्याने अल्पावधीतच उद्यानाची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे प्रभागातील नगरसेवकांच्या श्रेयवादावरून ऐन सुटीच्या काळातच खेळण्याच्या उद्यानाला कुलूप लावण्यात आल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
जुने सिडको येथील प्रभाग क्रमांक २४ मधील मलनिस्सारण केंद्राच्या जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान व क्रीडांगण उभारण्यासाठी नगरसेवक कल्पना पांडे यांनी प्रस्ताव होता. मनपा निवडणुकीच्या तोंडावरच या उद्यान व क्रीडांगणाचे लोकार्पण युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होेते. परंतु लाखो रुपये खर्च करून उद्यानात उभारण्यात आलेली विद्युत दिव्यांची तोडफोड झालेली असून, याबरोबरच येथील लॉन्स खराब झाले आहे.
तसेच येथील जॉगिंग ट्रॅक धुळीमुळे खराब झालेले असतानाही मनपा प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नाही. यातच ऐन सुटीच्या काळात उद्यानाला कु लूप लावण्यात आल्याने खेळण्यासाठी येणाऱ्या बालगोपाळांना येत नसल्याने त्यांचाही हिरमोड होत आहे. लोकार्पण झाल्यानंतर अल्पावधीतच उद्यानाला देखभालीअभावी घरघर लागली असल्याचे चित्र बघावास मिळत आहे.
या उद्यानात लावण्यात आलेली रोपे पाण्याअभावी कोमजली असून, झाडांच्या ठिकाणी गाजरगवत वाढले आहे. तसेच लॉन्स खराब झाले आहे. उद्यानात सुरक्षा रक्षकांसाठी जागा केली असली तरी सुरक्षा रक्षकच नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. या उद्यानात ठिकठिकाणी बसविण्यात आलेले आकर्षक विद्युत दिवे फुटले आहे.