पीककर्ज देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:25 PM2020-07-17T17:25:57+5:302020-07-17T17:28:14+5:30
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध विकास सोसायटी ही मुख्य अर्थवाहिनी आहे. तथापि, सद्यस्थितीत ही संस्था आर्थिक डबघाईला आली असून, नियमितपणे कर्जफेड करणा-या सभासदांना या संस्थेद्वारे पीककर्ज मिळत नसल्याचे भयानक वास्तव आहे. चालू हंगामात अशा सभासदांना पीककर्ज मिळण्याची मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण नागरे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
नाशिकरोड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध विकास सोसायटी ही मुख्य अर्थवाहिनी आहे. तथापि, सद्यस्थितीत ही संस्था आर्थिक डबघाईला आली असून, नियमितपणे कर्जफेड करणा-या सभासदांना या संस्थेद्वारे पीककर्ज मिळत नसल्याचे भयानक वास्तव आहे. चालू हंगामात अशा सभासदांना पीककर्ज मिळण्याची मागणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण नागरे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील विविध विकास सहकारी संस्थांची स्थिती कमालीची ढासळली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची हक्काची अर्थवाहिनी समजली जाणारी ही संस्था आर्थिक समस्येच्या बिकट परिस्थितीत वाटचाल करत आहे. नाशिक तालुक्यातील चाडेगाव येथील सोसायटी स्थापन झाल्यापासून शंभर टक्के कर्जफेड करत आहे. नोटाबंदी काळातही संस्थेच्या सभासदांनी वेळेत कर्जफेड करूनही कर्ज व कर्जमाफी किंवा प्रोत्साहन रक्कम मिळाली नसल्याचे सोसायटी चेअरमन नागरे यांनी निवेदनात नमूद केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत १० टक्के सभासदांना कर्जमाफी रक्कम आली असून, शासनाच्या धोरणानुसार याच थकबाकीदार सभासदांना कर्जवाटप केले जाणार आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणा-या उर्वरित सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज सभासद इतर राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्ज घेण्यासाठी गेल्यास भविष्यात सोसायटीच्या आर्थिक उलाढालीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. एकीकडे संस्था चालवणे, कर्मचाºयांना पगार देणे आदी अन्य खर्च वाढत आहे. अशीच स्थिती जिल्ह्यातील बहुतेक विविध विकास संस्थांची आहे. शेतकºयांची हक्काची अर्थवाहिनी असणारी ही संस्था टिकवण्यासाठी चालू हंगामात संस्थेमार्फत पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी नागरे यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.