सुखासाठी लोभाचा त्याग करावा : रुद्धपूरकर बाबा शास्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:24 AM2019-11-02T01:24:03+5:302019-11-02T01:24:23+5:30
सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल.
नाशिक : सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल. त्याकरिता राग-लोभाचा म्हणजेच द्वेष आणि स्वार्थाचा त्याग करावा लागेल असे विचार अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य महंत रुद्धपूरकर बाबा शास्त्री यांनी मांडले.
कोणार्कनगर, आडगाव येथील पंचकृष्ण लॉन्स येथे शुक्रवारी (दि.१) महानुपंथीयांच्या वतीने विश्वशांती ज्ञानयज्ञ अर्थात ब्रह्मविद्या निरुपण महावाक्य सोहळ्यास प्रारंभ झाला. याप्रसंगी उद्घाटन सत्रात अध्यक्षस्थानावरून निरुपण करताना महंत शास्त्रीजी बोलत होते. यावेळी शास्त्रीजी म्हणाले की, मनुष्याच्या मनात शांती असेल तर समाजात आणि संपूर्ण विश्वात शांती नांदू शकेल. त्यासाठी आपल्याला षट्रिपूचा म्हणजे काम, क्रोध, मद्, मत्सर, आदी गोष्टींचा जीवनातून त्याग करून सद्विचारांचा अंगीकार करावा लागेल, असेही शास्त्रींनी यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष आचार्य महंत खामणीकर बाबा, आचार्य महंत विध्वंस बाबा यांनीदेखील विश्वशांती ज्ञानयज्ञ तसेच ब्रह्मविद्या निरुपण याविषयी सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे यांनी विश्वशांती ज्ञानयज्ञाचा उद्देश स्पष्ट केला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी याप्रसंगी व्यासपीठावर आचार्य प्रवर महंत नागराजबाबा शास्त्री, आचार्य महंत पुजदेकर बाबा, आचार्यप्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, आचार्य महंत राहेरकरबाबा, आचार्य महंत कृष्णराजबाबा, महंत हेमंतराजबाबा बीडकर, महंत युवराज बाबाशास्त्री, आचार्य महंत मचालेबाबा, महंत वैरागीबाबा, महंत भीष्माचार्य बाबा, महंत दत्तराजबाबा, वामनमुनी अंकुळनेकरबाबा, आचार्य महंत डॉ. दत्तराज शास्त्री, महंत तपस्वीनी सुभद्रा शास्त्री कपाटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी देवाला विडा अर्पण करण्यात आला. तसेच संत महंतांचा सत्कार झाला. या ज्ञानयज्ञात आचार्य प्रवर महंत नागराजबाबा शास्त्री महिनाभर ब्रह्मविद्या निरुपण करणार आहेत.
दुपारच्या सत्रात निरुपण
विश्वशांती ज्ञानयज्ञानिमित्त दुपारच्या सत्रात आचार्यप्रवर महंत नागराज शास्त्री यांनी ब्रह्मविद्या महावाक्य या विषयावर निरुपण केले. यावेळी शास्त्री यांनी सांगितले की, सुमारे ३० वर्षांपूर्वी फैजपूर येथे मोठे बाबाजी यांनी विश्वशांती ज्ञानयज्ञाचा प्रारंभ केला. दरम्यान, शुक्रवारी पहाटे देवपूजा विधी, पारायण, गीतापाठ आदी कार्यक्रम झाले.